कांद्याचा साडेचार हजाराला स्पर्श, सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा

कांदा दर वाढले,www.pudhari.news

लासलगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणासाठी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केल्याने गत दीड महिन्यात आंदोलनाचा भडका उडाला. सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी हा निर्णय किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी फोल ठरला आहे. उन्हाळ कांद्याने चार हजार रुपयांच्या दराला स्पर्श केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंतेचे मळभ दूर होऊन तब्बल तीन महिन्यांनंतर हास्य फुलले आहे. (Nashik Onion News)

कांद्याच्या बाजारभावात या निर्णयाचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे चित्र दिसत आहे. लासलगाव बाजार समितीत बुधवारी उन्हाळ कांद्याला किमान २२०० रुपये, कमाल ४५५१ रुपये, तर सरासरी ४३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लाल कांद्याची आवकदेखील सुरू झाली असून, त्याचे प्रमाण अल्प आहे. लाल कांद्याला किमान ३४००, कमाल ३८००, तर सरासरी ३४०० रुपयांचा दर मिळाला. (Nashik Onion News)

विदेशातही उत्पादनात घसरण

अफगाणिस्तान, तुर्कस्तान आणि पाकिस्तानात कांद्याची उपलब्धता नसल्याने दुबई, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, बांगलादेशमध्ये भारतातून कांदा निर्यात होत आहे. याचा परिणाम म्हणून उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. उन्हाळी कांद्याचे दर साडेचार हजार रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत. शिवाय येत्या काही दिवसांत कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने भविष्यात कांदा उत्पादकांना आणखी दिलासा मिळेल, असे चित्र तयार होत आहे.

महिनाभर तेजी टिकणार

सध्या उन्हाळ कांदा शेतकऱ्यांकडे खूपच कमी प्रमाणात शिल्लक राहिला आहे. ज्यावेळी उन्हाळी कांदा संपतो त्यावेळी बाजारात नवीन हंगामातील लाल कांदा येत असतो. सध्या नवीन हंगामातील लाल कांदा बाजारात आला आहे. पण नवीन कांद्याची आवक खूपच कमी आहे. नवीन लाल कांदा आवक आणखी एका महिन्यानंतर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील एक महिना तरी बाजारात तेजी कायम राहील, असे मत व्यक्त होत आहे.

आवक निम्म्यावर

देशासह जगाला कांदा पुरवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा आवक निम्म्याने घटली आहे. तर या हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने नवीन लाल कांदाही अजून अल्प प्रमाणात विक्रीस येत आहे. खरीप पिकाची स्थानिक बाजारपेठेत आवक कमी झाल्याच्या चिंतेमुळे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात घाऊक कांद्याचे भाव आठवडाभरात जवळपास ३५ टक्क्यांनी वाढले आहेत.

हेही वाचा :

The post कांद्याचा साडेचार हजाराला स्पर्श, सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा appeared first on पुढारी.