कांद्याची घसरगुंडी! मागणी घटल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड 

येवला ( जि.नाशिक) : सप्ताहात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला व अंदरसूल आवारात लाल कांद्याची आवक टिकून होती. तर देशावर मागणी कमी झाल्याने बाजारभावात घसरण झाली. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्य व परदेशात मागणी सर्वसाधारण होती.

लाखो रुपयांचा भुर्दंड

सप्ताहात कांदा आवक ४३ हजार ४३३ क्विंटल झाली असून, लाल कांद्याचे बाजारभाव किमान ५०० ते कमाल तीन हजार ४८१, तर सरासरी दोन हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. तसेच अंदरसूल उपबाजारात कांद्याची आवक २६ हजार ५०० क्विंटल झाली. बाजारभाव तीन हजार ५८५ रुपयांपर्यंत होते. या आठवड्यात दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून, लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. 

कडधान्याचे प्रतिक्विंटल दर... 
गव्हाच्या आवकेत वाढ झाली. बाजारभाव सरासरी एक हजार ६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. बाजरीचे दर सरासरी एक हजार १३५ रुपयांपर्यंत होते. हरभऱ्याची आवक २१४ क्विंटल झाली. सरासरी दर चार हजार ३५० रुपयांपर्यंत होते. तुरीला सरासरी सहा हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोयाबीन सरासरी चार हजार ६०० रुपयांपर्यंत विक्री झाली. मकाची आवक २४ हजार ४९५ क्विंटल झाली. बाजारभाव किमान एक हजार २०० ते कमाल एक हजार ५२१, तर सरासरी एक हजार ४६० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. अंदरसूल उपबाजारात मकाची आवक एक हजार ३६६ क्विंटल झाली. बाजारभाव सरासरी एक हजार ३९० रुपयांपर्यंत होते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.