कांद्याच्या उत्पादनात ४० टक्के घट! शेतकरी हतबल, मजुरांची टंचाई  

तळवाडे दिगर (जि.नाशिक) : रणरणत्या उन्हाचा चटका सर्वत्रच जाणवत आहे. कांद्याचे आगर असलेल्या कसमादेतील सर्वच तालुक्यांत सध्या उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे. वातावरणातील बदलाचा सामना करत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. त्यानंतरही मर रोग, करपा, कूज या रोगांचा प्रादुर्भाव कांदापिकावर झाला.

शेतकऱ्यांना अडचणींचा सामना

शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करून कांदा जागवला. मात्र यंदा थंडीचे कमी प्रमाण, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे कांद्याच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पन्नात ३५ ते ४० टक्के घट झाल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. दुपारी कडक उन्हात काढणीस आलेले कांदापीक भाजू नये म्हणून शेतकरी कांद्याची पात व उसाच्या पाचटाचा वापर करत आहेत. काही ठिकाणी शेतातून कांदा काढून लगेचच चाळीत भरण्यावर शेतकऱ्यांनी भर दिल्याचे चित्र दिसत आहे. एप्रिलच्या सुरवातीपासूनच मोठ्या प्रमाणात कांदा काढणीला सुरवात झाली असून, काढणीसाठी तीव्र मंजूर टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. रोजंदारीने एकही मजूर येण्यास तयार नाही. सर्व ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कांदा काढणी सुरू आहे. नंदूरबार व नवापूर जिल्ह्यांतील आदिवासी मजूर कांदा काढणीसाठी तालुक्यात आले आहेत. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

बाजारभाव नसल्याने साठवणुकीवर भर 
कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदापिकाचे उत्पादन घेतले जाते. कांदापीक शेतकऱ्यांच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे पीक असल्याने त्याच्या बाजारभावावर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून असतात. कांदा रोप उपलब्ध करण्यापासून ते कांदा लागवड, खुरपणी, औषध फवारणी, काढणी, भरणी आदीपासून ते काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची भांडवली गुंतवणूक होते. त्यातच समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही, तर भांडवलही सुटत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कांद्याला हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

कांदा लागवडीची आकडेवारी (हेक्टरमध्ये) 
कळवण- २१,१२१ 
सटाणा- ४६,९०३ 
मालेगाव- १३,२४३ 
देवळा- १७,५५१