कांद्यावरील निर्यातशुल्काचा फेरविचार करावा : डॉ. भारती पवार

भारती पवार,www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेत कांद्यावर केंद्र सरकारने लागू केलेल्या ४० टक्के निर्यातशुल्काचा फेरविचार करावा, अशी मागणी करत त्यांना संबंधित मागणीचे पत्रही दिले आहे.

कांदा दरवाढीच्या भीतीने केंद्र सरकारने ४० टक्के निर्यातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक होत रस्त्यावर उतरले होते. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांची भेट घेत कांदा निर्यातशुल्काबाबत चर्चा केली. यावेळी डॉ. पवार यांनी गोयल यांना एक पत्र दिले. पत्रामध्ये कांद्याच्या निर्यातशुल्कात वाढ करण्यात आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत लावण्यात आलेल्या या निर्यात शुल्काविरोधात पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या आठ‌वड्यात केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर करताच नाशिक जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलने झाली होती. या निर्णयानंतर केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेत कांद्याला २,४१० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचे जाहीर केले. मात्र, त्यांनतरही कांदा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव दोन दिवस बंद ठेवले होतेे. डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी बैठकीत कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढत कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेतलेला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी गोयल यांना याबाबत सर्व माहिती सादर करत शुल्क मागे घेण्याचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा :

The post कांद्यावरील निर्यातशुल्काचा फेरविचार करावा : डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.