नाशिक : बारावीनंतर कृषी शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत विविध अडचणी आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलमार्फत महाविद्यालयांसाठी सूचना जारी केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेच्या मुद्यावर प्रवेशात अडथळे आणू नये, असे बजावले आहे.
सीईटी सेलने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या प्रवेश फेरीत वाटप झालेल्या उमेदवारांना संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून प्रवेश घेणे अडचणी होत आहे. उमेदवारांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रवेशवाटप यादीनुसर महाविद्यालय स्तरावर प्रवेश देताना उमेदवाराची वस्तुस्थिती विचारात घेत निर्णय घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच
..तर त्यांना प्रवेश द्यावा
प्रवेशवाटप पत्रावर नमूद केलेल्या माहितीनुसार (प्रवर्ग, अधिभार, गुणवत्ता आदी) उमेदवाराने कागदपत्रे अपलोड केलेली नसल्यास, मात्र प्रवेश देताना उमेदवाराकडे मूळ कागदपत्रे उपलब्ध असतील, तर त्यांना प्रवेश द्यावा. केवळ कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत किंवा चुकीच्या ठिकाणी अपलोड केलेली आहेत, असे कारण देत प्रवेश रद्द करू नये. याबाबतची मूळ कागदपत्रे प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या मंजुरीपर्यंत महाविद्यालयांनी जतन करून ठेवावीत. प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतर महाविद्यालयांनी अशी प्रकरणे स्वतंत्ररीत्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांना सादर करावीत. तात्पुरत्या गुणवत्ता यादीत नमूद केलेला प्रवर्ग, अधिभार, गुणवत्ताविषयक बाबी आदी संदर्भात उमेदवाराने कोणतीही हरकत घेतलेली नसताना, अंतिम गुणवत्ता यादीत प्रवर्ग, अधिभार, गुणवत्ताविषयक बाबींमध्ये बदलाविषयी उमेदवाराची हरकत असल्यास शहानिशा करावी व संबंधित छाननी अधिकाऱ्यांच्या समन्वयाने योग्य सुधारणा महा. आय. टी. ,मुंबई यांनी करावी. सुधारणांनुसार पुढील वाटप फेरी राबवावी, अशा सूचना केल्या आहेत.
हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल
दरम्यान, यापूर्वी जारी केलेल्या वेळापत्रकानुसार दुसरी वाटपयादी रविवारी (ता. ७) जाहीर केली जाणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी गुरुवार (ता.११)पर्यंत मुदत असेल.