कागदोपत्री तडीपार तरीदेखील घरफोड्या; हुक्का गँगच्या दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नाशिक : शहर पोलिसांनी दोन वर्षांसाठी शहर-जिल्ह्यातून तडीपार केले असूनही शहरात विविध भागांत घरफोड्या करणाऱ्या हुक्का गँगच्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्यासह तिघांकडून पोलिसांनी साडेचार लाखांचा ऐवज हस्तगत केला. तब्बल आठ घरफोड्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. 

दोघे तडीपार 
संशयित बाबू अन्सारी व वसीम अब्दुल रेहमान शेख हे दोघे भारतनगर भागातील रहिवासी असून, दोघांना पोलिसांनी यापूर्वीच तडीपार केले आहे. तडीपार असूनही ते नाशिक शहरात फिरत असल्याचे यापूर्वी आढळून आल्याने पोलिसांनी दोघांवर प्रतिबंधात्मक कारवायाही केल्या आहेत. तरीही हे दोघे दीपक गायकवाडसोबत ठिकठिकाणी घरफोड्या करीत असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक के. टी. रौंदळ, हवालदार सोनार, डंबाळे आदींसह मुंबई नाका पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.  

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

काही घरफोड्यांची उकल होण्याची पोलिसांना आशा
बाबू पप्पू अन्सारी ऊर्फ सोहेल, वसील अब्दुल रेहमान शेख, अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याशिवाय दीपक गायकवाड या तिघांकडून पोलिसांनी १८ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची नथ, चार लिनोव्हा आणि डेल कंपनीचे लॅपटॉप, गॅस सिलिंडर शेगडी, ॲपलचा आयफोन, फिलिप्स कंपनीचा मिक्सर, स्टीलची पंचपात्री, चांदीचे ताट, चांदीचे फुलपात्र, असा सुमारे चार लाख ५५ हजार ४४० रुपयांचा ऐवज जप्त केला. गुरुवारी (ता.२८) परिमंडळ एकच्या मुंबई नाका आणि भद्रकाली अशा दोन पोलिस ठाण्यातील घरफोड्यांशिवाय इतरही काही घरफोड्यांची उकल होण्याची पोलिसांना आशा आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी ही माहिती दिली. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल