कामकाज म्हणजे नेमके करायचे तरी काय? संमेलनाच्या नियोजनातील समित्यांचा आढावा बैठकीत प्रश्‍न 

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले असले, तरी नियोजनासाठी गठित केलेल्या ३९ समित्यांचे कामकाज ऑनलाइन-ऑफलाइन पद्धतीने सुरू आहे. मात्र, संमेलनाच्या नवीन तारखा जाहीर झालेल्या नसल्याने नेमके काय काम करायचे, याबाबत समित्यांच्या सदस्यांमध्ये संभ्रमाची वातावरण आहे. 

अशा पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. १३) समित्यांचे मुख्य समन्वयक विश्‍वास ठाकूर यांनी आढावा बैठक घेतली. यात, छायाचित्रण व ध्वनिमुद्रण, तांत्रिक समिती सर्व कार्यक्रमांचे चित्रीकरण करणार आहे. तर संमेलनाचे प्रक्षेपण रेडिओ विश्‍वास करणार असल्याचे  ठाकूर यांनी या वेळी सांगितले. संमेलनाच्या विविध समित्यांनी आतापर्यंत झालेले काम तसेच, पुढील नियोजनाबाबत सादरीकरण केले. त्यात, गझल कट्टा, उदघाटन व समारोप, सत्कार, मुद्रण, चित्रकला आदी समित्यांचे बरेचसे नियोजन झालेले आहे. बैठकीत सर्व समित्यांचे प्रमुख, उपप्रमुख उपस्थित होते. यापुढे नेमके काय काम करायचे आहे, कामाचे स्वरूप कसे असावे, याबाबत माहिती मिळाली पाहिजे, असे डॉ. मोरे यांनी सांगितले. दरम्यान, स्मरणिकेत १०० वर्षे विज्ञान साहित्य, २१ व्या शतकातील मराठी वाङ्‌मय कला व साहित्य, नाशिकचे साहित्यातील योगदान आदी स्वरूपाचे लेख असतील. स्वयंसेवक समितीत तीनशे स्वयंसेवक आणि ज्येष्ठ नागरिकांनाही सामावून घेतले आहे. महाविद्यालयांनी पुढाकार घेत स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. वेबसाईट, डोमेन पूर्ण झाले असून सोशल मिडीया समिती ई नोंदणी करणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO