कामगारांच्या पगारातून वर्षाकाठी १५६ कोटी इएसआयसीमध्ये वर्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – कारखान्यात काम करीत असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात हाताचा अंगठा गमावलेल्या कामगारावर चक्क रात्री ११ वाजेनंतर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सातपूर औद्योगिक वसाहतीतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात तातडीच्या शस्त्रक्रियेची व्यवस्था नसल्याने संबंधित रुग्णास टायप रुग्णालयांमध्ये जाण्याचा सल्ला दिला गेला. मात्र, इएसआयसीकडून वेळेत पैसे दिले जात नसल्याचे सांगत या रुग्णालयांनी रुग्णास दाखल करून घेण्यास स्पष्ट नकार दिला. हा संपूर्ण प्रकार रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होता. अखेर या रुग्णास मुंबईनाका येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर उपचार केले गेले.

कामगारांच्या आरोग्यासाठी त्यांच्या पगारातून इएसआयसीला महिन्याकाठी १३ रुपये तर वर्षाकाठी १५६ कोटी रुपये दिले जातात. मात्र, सातपूर औद्योगिक वसाहतीतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आणि इएसआयसीच्या स्थानिक कार्यालयातील गलथान कारभारामुळे कोट्यावधी रुपये देवून देखील रुग्णांना याठिकाणी उपचार मिळणे दुरापस्त होत आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारी (दि.११) आला.

इएसआय रुग्णालयात प्लास्टीक सर्जरी करणारे सर्जन नाहीत. त्यामुळे ज्या रुग्णांना प्लास्टीक सर्जरीची गरज असते, अशा रुग्णांना करार असलेल्या रुग्णालयात पाठविले जाते. मात्र, त्यांची देयके बाकी असल्याने ते उपचार करत नसतील तर ती बाब आमच्या अखत्यारीत येत नाही. – डाॅ. सराेज जवादे, वैद्यकीय अधीक्षक, इएसआय रुग्णालय, सातपूर

काय घडले होते?

सातपूर औद्याेगिक वसाहतीतील एका कारखान्यात काम करणाऱ्या मुकेश कुमार या कामगाराचा दुपारी दिड वाजेच्या सुमारास अपघात झाला. कंपनी व्यवस्थापनाने त्यास तत्काळ सातपूर येथील इएसआयसी रुग्णालयात दाखल केले. मात्र, हाताचा अंगठा तुटल्याने, त्याच्यावर तातडीची प्लास्टीक सर्जरी करणे गरजेचे होते. डॉक्टरांनी त्यांस शहरातील दोन ते तीन टायप रुग्णालयाचे पत्ते दिले. त्यानुसार जखमी कामगारास या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रत्येक रुग्णालयाने इएसआयसीकडून पैसे वेळेत मिळत नसल्याचे सांगत रुग्णास दाखल करून घेण्यास नकार दिला. तर एका रुग्णालयाने कामगारास दाखल करून घेण्याची तयारी दर्शविली, मात्र नातलगांकडे डिपॉझिट रक्कम भरण्यास सांगितले. हा सर्व प्रकार रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होता. अखेर कंपनी व्यवस्थापन आणि नातलगांनी मुंबईनाका येथील एका खासगी रुग्णालयात रुग्णास दाखल केले. दरम्यान, कामगारांकडून कोट्यावधी रुपये वसुल करून देखील रुग्णांची अशाप्रकारे हेळसांड होत असल्याने, उद्योग जगतातून या घटनेचा निषेध केला जात आहे.

इएसआय रुग्णालयातील डॉक्टरांची वागणूक कामगार रुग्णांप्रती योग्य नाही. अनेकवेळा तक्रारी करून देखील लक्ष दिले जात नाही. आम्ही केलेल्या तक्रारींमुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात लोकअदालत घेण्यात आली. मात्र, अशाही सुधारणा होत नसेल तर मोठी शोकांतिका आहे. – धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा

रुग्णालय प्रशासन व कर्मचारी विमा महामंडळ अधिकारी या दाेघांमध्येही समन्वय नाही. त्यामुळे रूग्णालयातील रुग्णसेवेचा पुरता बाेजवारा उडालेला आहे. रुग्णांशी अरेरावी केली जाते. वैद्यकीय अधीक्षकांकडून मिळणारी उत्तरे अनाकलनीय असतात. – कैलास माेरे, अध्यक्ष, दुर्घटनाग्रस्त कामगार संघटना.

हेही वाचा: