काय गुन्हा ‘ति’चा? डोळे उघडून जग पाहण्याआधीच जन्मदाते उठले जीवावर; संतापजनक घटना

नाशिक रोड : एकीकडे महिलादिनानिमित्त स्त्रीशक्तीचा सन्मान होत असतानाच दुसरीकडे अत्यंत भयानक व क्रूर घडना समोर आली आहेएखाद्या जीवाला नऊ महिने पोटात वाढवून ती जगात आल्यावर स्वत:चे जन्मदातेच तिला डोळे उघडून जग पाहण्याआधीच जीवावर उठतात. यापेक्षा दु:खदायक बाब कुठलीच असू शकत नाही. असाच एक संतापजनक तसेच अंगावर काटा आणणारी बाब प्रकार समोर आला आहे. काय घडले नेमके?

या प्रकारामुळे परिसरात खळबळ
परिसरातील आनंदेश्‍वर महादेव मंदिर, दशक्रिया शेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. मंगळवारी (ता. ९) दुपारी दीडच्या सुमारास गावातील मासे पकडणारी मुले नदीवर जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला ड्रेनेज चेंबरमधून लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्या ठिकाणी भूषण परदेशी यांच्या घराचे बांधकाम सुरू असून, परदेशी आणि जंगम बर्डे यांनीदेखील हा आवाज ऐकला. त्यांनी तत्काळ ही बाब माजी नगरसेवक ॲड. सुनील बोराडे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांच्या मदतीने बाळाला बाहेर काढले.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

माता-पित्यांनी प्लॅस्टिकच्या गोणीत बांधून ड्रेनेज चेंबरमध्ये टाकले

या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांनी बाळाला स्वच्छ करून कपडे घातले. त्यानंतर ॲड. बोराडे आणि परिसरातील नागरिकांनी बाळाला पंचक येथील दवाखान्यात नेले. त्या वेळी, तेथील नर्सने बाळाला तपासले व या बाळाच्या आईची प्रसूती येथेच झाली असून, आजच सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांना डिस्चार्ज दिल्याचे सांगितले. ॲड. बोराडे यांनी रुग्णालयातील रेकॉर्ड तपासले असता, मातेचे नाव स्वाती जाधव असून, जय भगवती लॉन्स, मोरे मळा असा पत्ता असल्याचे समजते. याबाबत नाशिक रोड पोलिसांना माहिती कळविण्यात आली असून, पोलिस तपास करत आहेत. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO

आईविरुद्ध गुन्हा दाखलघृणास्पद व संतापजनक प्रकार  

दुसरी मुलगी झाली म्हणून एका दिवसाच्या अर्भकाला निर्दयीपणे फेकून देणाऱ्या आईविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सुदैवाने नागरिकांनी एका दिवसाच्या स्त्री अर्भकास त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने ते सुखरूप आहे. रुग्णालयाच्या नोंदीवरून एक दिवसाच्या स्त्री जातीच्या जिवंत अर्भकास फेकून देणाऱ्या जेल रोड, मोरे मळा, भगवती लॉन्स येथील स्वाती जाधव या मातेला पोलिसांनी शोधून काढले. पोलिसांनी त्या अर्भकास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात जिवंत अर्भकास फेकून देणाऱ्या स्वाती जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस तपासात दुसरी मुलगी झाल्याने तिला फेकून दिल्याची कबुली दिली.