‘काय सफारी, काय नथ, काय पैठणी ओक्केमधी हाय सगळं’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये उमेदवारांकडून मतदार शिक्षकांना पैठणी, सफारी ड्रेस यासह सोन्याच्या नथींचे वाटप करण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ‘काय सफारी, काय नथ, काय पैठणी ओक्केमधी हाय सगळं’ अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या बुधवारी (दि. २६) मतदान होत आहे. मुख्यत: महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे, महायुतीचे विद्यमान आमदार असलेले किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात खरी लढत होत आहे. या निवडणुकीसाठी जवळपास ७० हजार शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी नाशिक जिल्ह्यात जवळपास २५ हजार शिक्षक मतदार आहेत. या शिक्षकांना उमेदवारांच्या वतीने सोन्याची नथ, सफारी ड्रेस आणि पैठणी यांचे वाटप सुरू असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्येदेखील उमेदवारांनी पैठण्यांचे वाटप केले असल्याचे समोर आल्यानंतर त्यावर अनेक चर्चा झाल्या होत्या. यंदादेखील निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात असे प्रलोभन देण्याचे प्रसंग समोर आलेले दिसून आले आहेत. या सर्व घडामोडींमुळे एका बाजूला उज्ज्वल भविष्य घडविणारे शिक्षक आणि दुसऱ्या बाजूला मतदार म्हणून प्रलोभनांना बळी पडणारे शिक्षक, अशा सुरस चर्चा समाजामध्ये घडताना दिसत आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये प्रलोभने देण्याचे प्रकार घडत आहेत. जे साने गुरुजी याच मतदारसंघात शिक्षक होते त्याच ठिकाणी शंभर वर्षांत एवढी घसरण झाली आहे. शिक्षकी पेशाला कलंक आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे. – हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ.

हेही वाचा: