
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्र शासन अंतर्गत कळवण तालुक्यात प्रथमच वाळू विक्री नोंदणी केंद्र सुरु झाले आहे. यात पूर्वी जी वाळू बांधकामासाठी 4 ते 5 हजार रुपये प्रति ब्रासप्रमाणे मिळत होती तीच वाळू महाराष्ट्र शासनाच्या धोरणामुळे 600 रुपये प्रति ब्रास प्रमाणे मिळणार आहे. यामुळे गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
1 मे 2023 पासून लागू केलेल्या वाळूची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरु झाली असून नोंदणी करताना नागरिकांनी रेशनकार्ड, आधारकार्ड, घरकुल प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी इत्यादी कागदपत्रे देणे आवश्यक आहे. तसेच मोबाईल क्रमांक अनिर्वाय आहे. घरकुल योजनेतील लाभार्थींना 5 ब्रास वाळू मोफत मिळेल तर इतरांना 600 रुपये प्रति ब्रास किंमतीने 10 ब्रास वाळू मर्यादित मिळेल. घरकुल लाभार्थी व इतरांनी वाळूची नोंदणी करताना 25 रुपये नोंदणी फी भरावी लागेल. नोंदणीनंतर बुकिंग आय. डी. असलेली पावती प्राप्त करून ती पावती वाळू डेपोवरील डेपो मॅनेजरला दाखवून वाहतूक पावती प्राप्त करून घ्यावी. डेपोपासून बांधकाम ठिकाणचा वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी नोंदणी झालेल्या व्यक्तीची राहील. वाळू डेपोपासून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाची व वाळूची नोंदणी सेतू कार्यलय कळवण येथे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उदघाट्नप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, तहसीलदार रोहिदास वारुळे, नायब तहसीलदार प्रज्ञा भोकरे, महसूल सहाय्यक कमलाकर पवार, मंडळ अधिकारी मनीषा पवार, तलाठी अविनाश पवार, घनश्याम गांगुर्डे, कारभारी राऊत आदिसह निविदा धारक तुषार वाघ, मनोज पगार, सागर जगताप, राकेश पगार, दीपक वाघ, पवन गांगुर्डे, सनी पगार, पोलीस पाटील ललित आहेर, राकेश गुंजाळ, सुभाष गांगुर्डे, सुनील गांगुर्डे आदी उपस्थित होते.
कळवण येथे प्रशासनामार्फत वाळू विक्री नोंदणी केंद्र सुरू झाले. तालुक्यात प्रथमच सुरु झालेल्या शासनाच्या या धोरणाचा सर्व लाभार्थी व नागरिकांनी लाभ घ्यावा. कागदोपत्री पूर्तता करून अंमलबजावणी करावी.
– विशाल नरवाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी.
हेही वाचा :
- Diwali 2023 : सलग मुहूर्तांमुळे वाहन बाजारात तेजोमयी दिवाळी
- भारतात 2026 मध्ये येणार इलेक्ट्रिक एअर टॅक्सी
- ‘गोडसाखर’चे धुराडे पेटणार तरी कधी?
The post काय सांगताय? वाळू मिळणार चक्क 600 रूपये ब्रास appeared first on पुढारी.