काय सांगता! रसाळ द्राक्ष पिकविली अन् तीही ‘टेरेस गार्डन’मध्ये? एकदा वाचाच काय आहे फंडा

नाशिक : ‘टेरेस गार्डन’मध्ये लगडलेत रसाळ द्राक्षांचे घड, ही किमया साधलीय विठ्ठल नंदन यांनी. शहरातील गंगापूर रोड परिसरातील अथर्व मंगल कार्यालयाशेजारील इमारतीच्या टेरेसवर त्यांनी कृषी क्षेत्रातील आपल्या अनुभवाच्या जोरावर कुंड्यांमध्ये द्राक्षबागेची किमया केली आहे. एकदा वाचाच

विठ्ठल नंदन यांनी दोन कुंड्यांमध्ये फुलवली बाग

नंदन मूळचे सटाणा येथील. ते कृषी विद्याशाखेचे पदवीधर आहेत. सुरवातीला त्यांनी शेती महामंडळात नोकरी केली. शहरातील ‘टेरेस गार्डन’मधील कुंड्यांमध्ये सर्वसाधारणपणे फुलझाडे आणि काही फळझाडे लावली जातात, पण नंदन यांनी कुंडीत द्राक्षांच्या उत्पादनाचा प्रयोग केला. त्यात ते यशस्वी झाले. दोन कुंड्यांत कलम केलेली फ्लेम सीडलेस जातीची कलमे त्यांनी जानेवारी २०१९ मध्ये लावली. रोपे टेरेसवर वाढवली. रासायनिक खते, औषधे वापरली नाहीत. केवळ घरगुती बनवलेले सेंद्रिय खत वापरले आणि किमान सेंद्रिय औषधांचा वापर केला. त्यांनी एप्रिलची अन्‌ ऑक्टोबरची छाटणी केली. गेल्या वर्षी द्राक्षांसाठी अनुकूल हवामान नसतानाही कुंड्यातील द्राक्षांना चांगला बहर आला होता. 

द्राक्षांची चव चाखण्यासाठी पक्षी लावता हजेरी

यंदा दोन वेलींना २५ घड लगडले आहेत. डाउनी आणि भुरीला सेंद्रिय औषधांनी नियंत्रणात आणले. टेरेसवर द्राक्षे खाण्यासाठी अनेक प्रकारचे पक्षी येताहेत. बुलबुल, साळुंकी, पोपट, कोकीळ, सूर्यपक्षी, चष्मेवाला आदी दहा प्रकारचे पक्षी द्राक्षांची चव चाखण्यासाठी आले आहेत. टेरेसमधील पालापाचोळा, पालेभाज्यापासून नंदन घरीच खत बनवितात. वातावरणातील बदलांमुळे द्राक्षवेलींवर त्यांना अधिक लक्ष द्यावे लागते. ‘टेरेस गार्डन’मध्ये द्राक्षवेल लावताना पूर्ण माहिती असल्याशिवाय प्रयोग करू नये, असा सल्ला ते देतात. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

लॉकडाउनमध्ये आम्ही घरीच भाजीपाला तयार केला होता. सध्या टेरेसवर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्याचा आनंद मिळतो. कुंडीतील द्राक्षांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता ‘टेरेस’मध्ये ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी, अननस लावणार आहे. सेंद्रिय ‘टेरेस गार्डन’ संकल्पना मी राबविणार आहे. - विठ्ठल नंदन  

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप