कारची काच फोडून दिवसाढवळ्या लांबवले १५ लाख; चोरट्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

जुने नाशिक : कारची काच फोडून सुमारे १५ लाखांची रक्कम लंपास करण्यात आले. ही घटना शुक्रवारी (ता. ५) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी रक्कम चोरी केल्याची माहिती तक्रारदाराने पोलिसांनी दिली. याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

दिवसा झालेल्या चोरीमुळे परिसरात भीती

तक्रारदार मयूर राजेंद्र बागड मुंबई- आग्रा महामार्गावरून जात असताना, मुंबई नाका परिसरातील छान हॉटेलसमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची कार (एमएच १५, एचजी २८६८) अडविली. कारची काच फोडून जबरदस्तीने रक्कम असलेली बॅग घेऊन पळ काढला. याबाबत माहिती मिळताच पोलिस उपायुक्त आमोल तांबे, विजय खरात, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, अशोक नखाते, प्रदीप जाधव, मुंबई नाका ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, पंचवटीचे अशोक भगत, सीताराम कोल्हे, युनिट एकचे आनंद वाघ यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून माहिती घेतली. तक्रारदार बागड याच्याशी चर्चा केली. सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र, कुठलेही ठोस पुरावे हाती लागले नाहीत. सायंकाळी उशीरा मुंबई नाका पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा प्रकार दिवसा ढवळ्या झाल्याने परिसरात भितीचे वातावरण होते.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

एवढी रक्कम आली कुठून?

चौकशी करूनही तक्रारदाराकडे एवढी रक्कम आली कुठून याची माहिती मिळू शकली नाही. त्याबाबत पोलिस त्याची अधिक चौकशी करीत आहेत. कुणीतरी लक्ष ठेवून होते. त्यांच्याकडूनच रक्कम चोरी केली असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. परिसरातील नागरिकांचीही घटनास्थळी गर्दी झाली होती. दिवसा ढवळ्या घटना घडली तरीही संशयितांना कुणी कसे बघितले नाही? तक्रारदाराने आरडाओरड का केली नाही? परिसरातील सीसीटिव्हीत कसे काही आले नाही, असे प्रश्‍न पोलिसांसह परिसरातील नागरिकांना पडले आहेत. त्या दिशेने पोलिस तपास करीत आहे. कुठलेही पुरावे हाती लागले नसल्याने पोलिसांसमोर संशयितांना शोधण्याचे मोठे आव्हान आहे. 

घटना घडताच नाकाबंदी 

दुपारी घटना घडताच बिनतारी संदेश खणखणू लागले. सर्व पोलिस ठाण्यांना माहिती देत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरातील मुख्य रस्त्यांसह पळवाटा असलेल्या रस्त्यांवर बॅरेकेट्‌स लावत नाकाबंदी केली, तरी संशयितांचा तपास लागू शकला नाही. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

कारची काच फोडून जबरदस्ती रक्कम लंपास केल्याची माहिती तक्रारदाराने दिली. पोलिस तपास करीत आहेत. संशयितांच्या शोधार्थ चार पथके रवाना केली आहेत. तक्रारदाराकडे एवढी रक्कम आली कुठून याचाही शोध घेत आहोत. 
-विजय ढमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंबई नाका