कारभारी ठरले, आता विकासाचे आव्हान! पंधराव्या वित्त आयोगातील थेट निधीमुळे कामांची संधी 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : काठावरच्या बहुमत असलेल्या ठिकाणी फोडाफोडीचे राजकारण, तर कुठे बहुमत येऊनही सरपंचपदासाठी अनेक दावेदार असल्याने अंतर्गत रस्सीखेचीने निफाड तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीचे गावकारभारी ठरताना रंजक व तितक्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. गावकारभारी ठरले असले तरी निवडणुकीदरम्यान मतदारांना दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासन पूर्तीसाठी सत्ताधाऱ्यांची कसोटी लागणार आहे.

मात्र, पंधराव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या पाच वर्षांत कोटी रुपयांच्या निधीतून विकासाची संधी चालून आली आहे. वित्त आयोगाबरोबरच खासदार डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बनकर यांच्याकडून निधी खेचून आणल्यास संधीचे सोने करण्यासाठी गावकारभाऱ्यांनी कंबर कसायला हवी. 
निफाड तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी नव्हे एवढ्या अटीतटीच्या अन्‌ प्रतिष्ठेच्या झाल्या. नऊ सदस्यांची ग्रामपंचायत असलेल्या गावात किमान दोन्ही पॅनलचे १५ लाख रुपये खर्च झाले. हे पाहता या रणसंग्रामात किमान एकूण १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सरपंच, उपसरपंच निवडीनंतर हे कवित्व संपले आहे. पदाचा काटेरी मुकुट इच्छुकांनी परिधान केला आहे. त्यासाठी ‘साम-दाम-दंड’ या नीतीचा वापर झाला. एकतर्फी बहुमत असलेल्या ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्यानंतर काठावरच्या सत्तेच्या ठिकाणी गुप्त मतदान होऊन चमत्काराची अपेक्षा अल्पमतातील गटाने ठेवली. गावचे प्रमुख पद मिळाले; आता गरज आहे ती शब्दपूर्तीची. 

आश्‍वासनांचा विसर पडू नये 

निवडणुकीत पाणी, वीज, रस्ते करण्याबाबत जनतेला दिलेल्या आश्‍वासनांचा सत्ताधाऱ्यांना विसर पडायला नको. यासाठी विरोधी गटाबरोबर जनतेने जागृत राहण्याची गरज आहे. शासनाच्या अनेक योजनांबरोबर खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडे पाठपुरावा केल्यास निधी खेचून आणता येऊ शकेल. त्यामुळे हे पद खुर्ची गरम करून शोभेसाठी मिरविण्यापेक्षा विकासकामासाठी वापरले जावे. सत्कार सोहळे संपले असून, आता खऱ्या अर्थाने गावचा कारभार हाकण्यास सरपंचांनी सुरवात केली आहे. सरपंचपदावर अनेक ठिकाणी नवे चेहरे असल्याने त्यांना पहिल्यांदा काही महिने ग्रामपंचायतीचे कामकाज, शासकीय योजना समजून घ्याव्या लागतील. गावच्या विकासाचा आराखडा करून टप्प्याटप्प्याने त्याची पूर्तता करण्याचे कसब कारभाऱ्यांना पार पाडावे लागणार आहे. १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग होत असल्याने कामे करण्याची संधीही चालून आली आहे. एकंदरीत विकासात आदर्श गावची संकल्पना पूर्णत्वाला नेण्यासाठी नव्या कारभाऱ्यांसमोर आव्हानाचा डोंगर पार करावा लागणार आहे. 

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

महाविकास आघाडी आली अस्तित्वात 

निफाडचे राजकीय पटल अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. गावगुंडीचे राजकारण तर अगदीच टोकाचे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्या समर्थकांनी शड्डू ठोकले. त्यामुळे कुठे शिवसेनेचा भगवा फडकला तर काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला. विशेष म्हणजे, अनपेक्षित महाविकास आघाडीही अस्तित्वात आली. शिरवाडे वणीत तोडफोडीच्या राजकारणामुळे शिवसेनेला मिळालेली सत्ता राष्ट्रवादीच्या समर्थकांनी हिसकावून घेतली. तर एक सदस्य असताना आरक्षणाच्या चमत्काराने करंजगावला सरपंचपद मिळवीत शिवसेनेचा भगवा फडकला. औरंगपूरमध्ये सत्ता मिळवूनही अंतर्गत लाथाळ्यांमुळे राष्ट्रवादी समर्थकांनी सत्ता गमावली. निफाड पंचायत समिती सभापती रत्ना संगमनेरे यांच्या खेरवाडीत शिवसेना-राष्ट्रवादी समर्थक एकत्र येऊन महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आकाराला आला. असेच काहीसे महाविकास आघाडीचे चित्र दात्याणे येथे दिसले. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला. त्यांच्या गावातील समस्या समजावून घेतल्या आहे. गटा-तटाचे मतभेद न ठेवता सरपंचांकडून येणाऱ्या विकासकामांच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रयत्न करणार आहे. 
-दिलीप बनकर, आमदार, निफाड