कारागृहातच ‘एमडी’चे धडे, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

ड्रग्जविरुद्धची लढाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सामनगाव येथील ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला संशयित अर्जुन पिवाल हा शहराचा पहिला व मोठा ड्रग्ज पुरवठादार असल्याचे उघड झाले आहे. त्याने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असतानाच मुंबईतील इतर कैद्यांकडून ड्रग्जची माहिती घेतली. त्यानंतर कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो नाशिकमधील मुख्य ड्रग्ज पुरवठादार झाल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात शहर पोलिसांनी मुंबईतून आणखी एका संशयितास अटक केली आहे. (Nashik Drugs Case)

सामनगाव येथील एमडी प्रकरणात भूषण ऊर्फ राजा गणपत मोरे (३६, रा. ठाणे) या संशयितास अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ संशयितांना अटक केली आहे. त्यात शहरातील पुरवठादार व त्यांना एमडी पुरवणारे मुंबईतील पुरवठादारांचा समावेश आहे. तसेच या कारवाईतून ‘छोटी भाभी’सह नाशिकरोड भागातील पुरवठादारांना मुंबईतून एमडी मिळत असल्याचे उघड होत आहे. या गुन्ह्याचा तपास करताना अमली पदार्थविरोधी पथकाने आतापर्यंत आठ संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी पिवालसह इतर संशयितांची कसून चौकशी केली. त्यावेळी पिवाल याने संशयित मोरे याच्याकडून एमडी आणत असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने मुंबई गाठून मोरे याला ताब्यात घेतले. मोरेला अटक करून सोमवारी (दि.२३) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने संशयित मोरे यास पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, वडाळा गाव एमडी प्रकरणात संशयित ‘छोटी भाभी’ हिचा पती इम्तियाज याला मुंब्रा येथील संशयित सलमान फालके हा एमडी पुरवित होता. सलमान हा सध्या नाशिक पोलिसांच्या कोठडीत आहे. (Nashik Drugs Case)

ललितच्या पोलिस कोठडीत वाढ

सोमवारी (दि.२३) अंधेरी न्यायालयात मुंबई पोलिसांनी ललित पानपाटील-पाटील याला हजर केले. तपासासाठी ललितची पोलिस कोठडी वाढून देण्याची मागणी तपासी पथकाने केली. ‘या गुन्ह्यात एमडीचा मोठा साठा जप्त केला असून, एमडीच्या काही साठ्याची संशयित सचिन वाघ याने विल्हेवाट लावल्याचा संशय पोलिसांना आहे. ललितच्या सांगण्यानुसार वाघने साठा नष्ट केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे एमडी खरेच नष्ट केले की लपवून ठेवले आहे, यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती, सरकारी पक्षाने न्यायालयात दिली. यासह संशयित ललित व त्याचा भाऊ भूषण या दोघांचा ड्रग्ज व्यवसाय होता. त्यांची समोरासमोर चौकशी करायची असून, हे प्रकरण गंभीर असल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. त्यानुसार न्यायालयाने ललित यास २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कारागृहातील धागेदोरे

२०१९ च्या दरम्यान, संशयित अर्जुन पिवाल हा एका गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होता. त्यावेळी कारागृहात भेटलेल्या मुंबईतील काही संशयितांनी त्याला एमडीबाबत माहिती दिली. एमडीतील पैसा अर्जुनच्या नजरेत भरला. त्यानंतर त्याने जामीन मिळाल्यानंतर कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर २०२० पासून त्याने शहरात एमडी पुरवण्यास सुरुवात केली. त्याने शहरात अनेक ड्रग्ज पुरवठादार तयार केले. ड्रग्ज माफिया ललित पानपाटील-पाटील यानेदेखील कारागृहात छोटा राजन टोळीतील गुंडांशी संपर्कात आल्यानंतर एमडीची माहिती संकलित केली व कारखानाच टाकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे कारागृहातच एमडीचे धडे मिळत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा :

The post कारागृहातच 'एमडी'चे धडे, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर appeared first on पुढारी.