कारागृहातून सुटकेनंतर सराईत गुन्हेगाराचे जंगी स्वागत; महामार्गावरील जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मालेगाव (जि.नाशिक) : कारागृहातून नुकतीच सुटका झालेल्या चाळीसगावचा सराईत गुन्हेगार हैदर अली आसिफ अली सय्यद याचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. महामार्गावर जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिस यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

स्वागताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

उघड्या कारमधून हैदरचे स्वागत करणाऱ्या सुफियान (रा. आयेशानगर) व माजीद (रा. साठफुटी रोड) याच्यासह १५ ते २० जणांविरुध्द पवारवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सुफियानला अटक केली आहे. 
शहरात या पूर्वीही कारागृहातून सुटून आलेल्या गुन्हेगारांचे स्वागत करणे, सत्कार करणे, बॅनर, पोस्टर लावणे आदी प्रकार घडले आहेत. पोलिसांचा वचक नसल्याने गुन्हेगार प्रवृत्ती वारंवार डोके वर काढते. कारागृहातून सुटून आलेला हैदर चाळीसगाव फाटा भागातील एका फार्म हाउसवर मुक्कामी होता. शहरातील अनेक गुन्हेगारांनी त्याची भेट घेतली. त्याच्या स्वागताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली.

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

हद्दपारी प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे

पोलिसांनी व्हिडिओची कसून चौकशी करत शिपाई नवनाथ शेलार यांच्या फिर्यादीवरून संबंधितांवर सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करणे, गर्दी जमविणे, बेकायदेशीररित्या स्वागत कार्यक्रम करणे, कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे आदी संदर्भात १५ ते २० जणांविरुध्द पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अन्य संशयितांचा शोध घेत आहेत. सराईत गुन्हेगार हैदरविरोधात चाळीसगाव पोलिसांत डझनभर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. चाळीसगाव पोलिसांनी त्याचा हद्दपारी प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.  

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना