कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून खासदार श्रीकांत शिंदे पक्षाची भूमिका मांडणार

श्रीकांत शिंदे pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा कायम राखण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.१२) दुपारी चार वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खा. शिंदे या मेळाव्यात काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचा मूळ दावा आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर भाजपच्या आशा पल्लवित बनल्या असून, भाजपने नाशिकच्या जागेवर हक्क सांगितला आहे. नाशिकचा ताबा मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली असताना शिंदे गटही मागे नाही. खा. शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिंदे गटाच्या नाशिक जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

खा. शिंदे यांच्यासमवेत मेळाव्यात पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी हे लोकसभा निवडणुकांसदर्भातील पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने नाशिक शहर भगवेमय करण्यात आले आहे. युवा सेनेच्या वतीनेदेखील मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांनीदेखील हा कार्यकर्ता मेळावा यशस्वी करण्यासाठी तयारी केल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली आहे.

असा आहे खा. शिंदेचा दौरा
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मंगळवारी सकाळी ११ वाजता कहांडोळपाडा येथील दमणगंगा नदीवरील पुलाच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहणार आहे. त्यानंतर सुरगाणा नगर पंचायत येथील आठ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभासह डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने सुरगाण्यासाठी रुग्णवाहिका, अग्निशमन दल वाहन, घनकचरा संकलन वाहनासह इतर वाहनांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता खा. शिंदे नाशिकमधील मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

The post कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून खासदार श्रीकांत शिंदे पक्षाची भूमिका मांडणार appeared first on पुढारी.