कालिदासच्या खिडकीवर मोठी रांग; व्यावसायिक नाटकाच्या पहिल्या प्रयोगास नाशिककरांचा प्रतिसाद

नाशिक : कलापंढरीतील रसिकांना ‘अनलॉक’नंतर व्यावसायिक रंगभूमीवरील नाट्यप्रयोगाची प्रतीक्षा होती. अशातच, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या व्यावसायिक नाटकाची ‘तिसरी घंटा’ नाशिकमधील पहिल्या प्रयोगानंतर महाकवी कालिदास कलामंदिरात रसिकांना ऐकायला मिळणार आहे.

रविवारी (ता.१७) दुपारी बाराला हा नाट्यप्रयोग होत आहे. त्यासाठी बुधवार (ता.१३) पासून महाकवी कालिदास कलामंदिरच्या खिडकीवर तिकीट विक्रीला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी रसिकांकडून रांगा लावत तिकीट खरेदी करणे पसंत केले. याशिवाय ऑनलाइन बुकिंगही नाशिककरांनी केले आहे. अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड हे दोघेही नाशिककरांपुढे दहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी उत्सुक आहेत. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

नाट्यप्रयोगासाठी नाशिककर उत्सुक

पुन्हा एकदा ‘ड्रामा इंडस्ट्री’ आणि त्यावर अवलंबून असलेल्या घटकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ‘मेकअप रूम’ कलावंत आणि ‘बॅक स्टेज’च्या सहाय्यकांनी फुलून जाणार आहे. या पहिल्या व्यावसायिक नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने कलेविषयीची जळमटे आता दूर होणार असल्याने रसिकांकडून मिळालेल्या प्रतिसाद कलावंतांचा उत्साह दुणावणारा आहे. कोरोनामुळे जनजीवन ठप्प झालेले असतानाच रंगभूमीवरील पडदा बंद झाला होता. मध्यंतरी ‘क्रांतिसूर्य’ या हौशी कलावंतांच्या नाट्यप्रयोगाने कालिदासचा पडदा उघडला गेला. त्यानंतर ‘मी सावरकर बोलतोय’चा प्रयोग कालिदासमध्ये झाला होता. मात्र, खऱ्या अर्थाने व्यावसायिक रंगभूमीचा पडदा पहिल्यांदा ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगाने उघडला जाणार आहे. त्यामुळे नाशिककरदेखील नाट्यप्रयोगासाठी उत्सुक आहेत. त्याचेच प्रतिबिंब खिडकीवरील तिकीट खरेदीत उमटल्याचे पाहावयास मिळाले. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’च्या पुण्यात झालेल्या प्रयोगाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

जागतिक रंगभूमीच्या इतिहासात नाटक हे कधीच बंद झाले नव्हते. दुसऱ्या महायुद्धातसुद्धा नाटक बंद झाले नाही. मात्र, रंगभूमी बंद होण्याचे संकट पहिल्यांदा आले. नाशिककर रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद अप्रतिम आहे. दहा महिन्यांच्या कालावधीनंतर नाशिकमध्ये प्रयोग होत आहे. आतापर्यंत बाँबस्फोट झाले, नवीन वाहिन्या आल्या, क्रिकेटचा नवीन प्रकार आला, त्यातही नाटकाचे स्थान अढळ आहे. नाशिकमध्ये नाटकाचा प्रयोग होतोय हा आनंदाचा क्षण असून, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ची संपूर्ण टीम सज्ज आहे. 
- प्रशांत दामले, अभिनेता