नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरात गुरुवारी (ता. ११) नाट्यरसिक परिवार, नाशिक, राजा पत्की यांच्या स्मृतीस समर्पित एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मात्र, कालिदास कलामंदिरातील पर्यवेक्षक बाळासाहेब गिते यांनी महोत्सवातील हौशी रंगकर्मींची अडवणूक केल्याने त्यांच्याविरोधात नाट्यसेवा थिएटर्सने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे पत्रकाद्वारे तक्रार केली आहे.
कलाकारांची अडवणूक करत अपमानजनक वागणूक
महाकवी कालिदास कलामंदिरात गुरुवारी एकांकिका करता का, कैकेयी कॉलिंग, अधर्मयोद्धा यांचे प्रयोग रंगले, मात्र प्रयोग सुरू होण्याअगोदर एकांकिकेतील कलाकारांना पर्यवेक्षकांनी नाट्यगृहात सोडले नाही. नाट्यगृहाचे ६ मार्चला नोंदणी केली होती. मात्र महापालिकेचा त्या दिवशी कार्यक्रम असल्यामुळे गुरुवारी (ता. ११) ही तारीख दिली होती. कालिदास कलामंदिराच्या बोर्डवर गुरुवारी नाव असूनदेखील त्यांनी कलाकारांची अडवणूक करत अपमानजनक वागणूक दिली.
नाट्यसेवा थिएटर्सची आयुक्तांकडे तक्रार
हौशी रंगकर्मींसोबत असा प्रकार वारंवार होत असून, या तक्रारीची त्वरित दखल घ्यावी, असे आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. कालिदासमध्ये प्रयोग करण्यासाठी नोंदणी करावी लागते. ती नोंदणी पंधरा दिवसांआधीच झाल्याचे रंगकर्मींनी सांगितले. याआधीही मनसे चित्रपट सेनेने हौशी कलाकारांना चुकीची वागणूक दिली जात असल्याची तक्रार केली होती.
नाट्यरसिक, नाशिक यांचे नाटक ६ मार्चला सकाळी अकरा ते तीनचे सत्र बुक केले होते; परंतु संबंधित तारीख नाशिक महापालिकेने काढून घेतल्याने ६ मार्चऐवजी ११ मार्च ही तारीख बदलून घ्यावी लागली. ११ मार्चला नाट्यरसिकचे कलाकार सकाळी सभागृहावर पोचले असता व्यवस्थापनाने ६ मार्चची पावती चालणार नाही, असे सांगून कलाकाराशी अरेरावीची भाषा केली. कलाकारांना प्रवेश नाकारत अडवणूक केली.
-श्रीराम वाघमारे, रंगकर्मी, नाशिककालिदास नाट्यगृह ६ मार्चला नाट्यरसिक नाशिकने बुक केले होते, परंतु महापालिकेचा कार्यक्रम असल्यामुळे कालिदास व्यवस्थापनाने गुरुवारी (ता. ११) ही तारीख होती, मात्र गुरुवारी वेळेत येऊनही आम्हाला नाट्यगृह ताब्यात मिळाले नाही. आमच्याकडे बुकिंगची पावती असताना सुपरवायझर बाळासाहेब गिते यांनी आम्हाला कालिदासबाहेर काढले. गिते दरवेळी कालिदासला आलेल्या कलाकारांना त्रास देणे, कलाकार वाचन करीत असतील तर त्यांना हाकलून देणे असे प्रकार करत असतात.
-भूषण भावसार, रंगकर्मी, नाशिककालिदास कलामंदिरातील सुपरवायझर बाळासाहेब गिते यांनी नेहमीप्रमाणे प्रथम सत्र बुक असताना हेतुपुरस्सर अडवणूक केली. कलाकारांना उद्धट व अपमानजनक वागणूक नेहमी देतात. आजही त्यांनी कालिदासच्या बुकिंग बोर्डवर नाव असूनदेखील त्यांच्या वहीत नाव नाही, असे कारण सांगत सर्व कलाकारांची अडवणूक केली. -आनंद जाधव, नाट्यसेवा, नाशिक
कालिदास कलामंदिरात अकरा ते तीन या कालावधीत महोत्सव होता. माझ्याबद्दल ८० कलाकारांनी तक्रार केली आहे. त्यांना मी ओळखत नाही. कालिदासमध्ये कोरोनामुळे कमीत कमी लोकांना सोडण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले आहेत. दोन दिवसांपासून सुटीवर होतो आणि आज महाशिवरात्रीची सुटी असल्यामुळे महोत्सवाची नोंद घेता आली नाही म्हणून कलाकारांकडे पावतीची मागणी केली. पावती विचारणे गुन्हा नसून, महोत्सवासाठी कालिदासमध्ये कलाकारांना दहा वाजताच सोडण्यात आले होते.
-बाळासाहेब गिते, सुपरवायझर