कालिदास, गायकवाड सभागृहाच्या दरात पन्नास टक्के घट 

नाशिक : लॉकडाउन काळात गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली सिनेमागृहे, नाट्यगृहे नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आली; परंतु ५० टक्के प्रेक्षकांनाच बसण्याची परवानगी असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेनेदेखील कालिदास कलामंदिर नाट्यगृह, दादासाहेब गायकवाड सभागृह व नाशिक रोड येथील महात्मा गांधी टाउनहॉलच्या भाडे दरात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या शुक्रवारच्या सभेत सर्वानुमते मान्यता देण्यात आल्याने नाट्यप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. 

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर स्थायी समितीचा निर्णय 
मार्चमध्ये देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली. गर्दी होणारी ठिकाणे मात्र उशिराने खुली करण्यास परवानगी देण्यात आली. नोव्हेंबरमध्ये सिनेमागृहे, नाट्यगृहे खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला; परंतु कोविड प्रादुर्भाव लक्षात घेता. प्रेक्षक क्षमता ५० टक्के ठेवण्याची सूचना दिली. सात महिन्यांच्या बंदीमुळे अनेक सिने व नाट्यप्रेमींचा हिरमोड झाला, तर कलावंतांवरदेखील उपासमारीची वेळ आली होती. अनेकांना रोजची प्रॅक्टिस करता येत नव्हती. सिने व नाट्यगृहे सुरू करण्यात आली असली, तरी ५० टक्के प्रेक्षकक्षमतेमुळे खर्च भागत नसल्याने आर्थिक तंगी कायम होती.

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

भाडेदर सात हजार रुपयांपर्यंत खाली

शहरातील नाट्यप्रेमींच्या फ्रेंड्स सर्कल, नाट्यसेवा संस्था, अखिल भारतीय नाट्य परिषद, ऑर्केस्ट्रा असोसिएशन, कल्चरल वेल्फेअर असोसिएशन या संस्थांनी कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचे भाडे कमी करण्याची मागणी केली होती त्यानुसार ५० टक्के भाडेकपातीचा निर्णय स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी घेतला. एक वर्षासाठी भाडेदर कमी राहतील. कालिदास कलामंदिरासह भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृह व नाशिक रोड येथील महात्मा गांधी टाउनहॉलचे दरदेखील ५० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. कालिदास कलामंदिराचे भाडेदर सात हजार रुपयांपर्यंत खाली उतरतील. 
हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण

नाट्य कलावंत, नाट्य संस्था व नाट्यप्रेमींच्या मागणीनुसार नाट्यगृहाचे दर कमी केले जात आहेत. पुढील एक वर्षासाठी कमी केलेले दर असतील. -गणेश गिते, सभापती, स्थायी समिती