काल गावात एकही गुढी उभारली नाही; ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच भाक्षी गावात स्मशान शांतता

सटाणा (जि.नाशिक) : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात...नवचैतन्याचा दिवस...पण त्याच दिवशी गावात अचानक एक काळजाचा ठोका चुकविणारी बातमी येऊन ठेपली. आणि मग गावात भयाण स्मशानशांतता पसरली. 

ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी स्मशानशांतता

ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. १३) एकही गुढी उभारली नाही. सैन्यदलात देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेले तालुक्याचे भूमिपुत्र व जवान स्वप्नील अमोलक रौंदळ (वय २५) हे भाक्षी (ता. बागलाण) येथील रहिवासी असून यांना जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे वीरमरण आले. त्यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त समजताच सटाणा शहर व बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

पार्थिव अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय नाही

बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी सांगितले, की चार वर्षांपासून सैन्यदलात असलेले बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र जवान स्वप्नील रौंदळ यांचे सध्या जम्मू-काश्मीर येथील सैन्यदलाच्या उधमपूर सेक्टर येथे ट्रेनिंग सुरू होते. ट्रेनिंगदरम्यान ते ज्या रूममध्ये वास्तव्यास होते, त्या रूमला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत जवान स्वप्नील रौंदळ यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समजले आहे. जवान स्वप्नील रौंदळ यांचे पार्थिव भाक्षी येथे अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे तहसीलदार इंगळे-पाटील यांनी सांगितले. गृहरक्षक दलाचे जवान अमोलक रौंदळ यांचे ते पुत्र होत. 

मंगळवारी एकही गुढी उभारली नाही.
शहीद जवान स्वप्नील रौंदळ यांचे प्राथमिक शिक्षण भाक्षी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण सटाणा येथील लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये झाले होते. २०१६ मध्ये खडतर प्रशिक्षणानंतर स्वप्नील देशसेवेसाठी सैन्यदलात भरती झाले होते. पहिले पोस्टिंग राजस्थानमध्ये झाल्यानंतर नुकतीच दुसरे पोस्टिंग जम्मू-काश्मीरच्या सीबीएस सेक्टर येथे झाले होते. स्वप्नील अविवाहित असून, त्यांच्या मागे आई, वडील, एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त शहर व तालुक्यात येऊन धडकताच शोककळा पसरली. जवान रौंदळ यांच्या निधनानंतर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, तालुक्याने भारतमातेचा सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात मंगळवारी एकही गुढी उभारली नाही.