काळजी घ्या, अन्यथा लॉकडाउनची तयारी ठेवा! दुसऱ्या लॉकडाउनचे सावट 

नाशिक : शहर व जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असताना लोकांच्या सार्वजनिक वर्तनात मात्र बेशिस्त वाढत आहे. ‘मास्क वापरा, काळजी घ्या,’ असे सांगूनही प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा यंत्रणा दुसऱ्या लॉकडाउनचा गंभीरपणे विचार करीत आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ‘काळजी घ्या, अन्यथा लॉकडाउनची तयारी ठेवा,’ असे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

काळजी घ्या, अन्यथा लॉकडाउनची तयारी ठेवा 
शहरातील बाजार, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांसह अनेक मोठ्या गावांतही आठवडेबाजारातील गर्दी व त्यातील बहुतांशी नागरिकांचा बिनधास्त वावर व मास्कचा वापर होत नसल्याने कोरोनाची भीती नसल्यागत सगळे काही आलबेल आहे. जनजागृतीसाठी रोज आवाहन सुरू आहे. पण त्याचाही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाचा कुठलाही लवलेश नसल्यागत बाजारातील सामान्यांचा वावर आहे. शहरातूनही येणारे व्यावसायिक, नागरिक या भागात रोजच ये-जा कतात. बहुतांश मंडळी मास्क वापरत नाही. दिवसागणिक कोरोनाच्या संसर्गाची भीती वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काळजी घ्या किंवा दुसऱ्या लॉकडाउनची तयारी ठेवा, असे सूतोवाच केले आहे. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

महिन्यात चौपट वाढ 
शहर व जिल्‍ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. महिन्यापासून रुग्णसंख्येचा आलेख चढता आहे. एका महिन्यात जिल्ह्यात तीनशेहून पाचशे आणि आता थेट पावणेसातशेपर्यंत रुग्णसंख्या वाढत आहे. एका महिन्यात चौप्पट वाढ आहे. रुग्णांची आकडेवारी चिंतेचा विषय आहे. एका बाजूला कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे नागरिकांमधील भीतीचा कुठेही लवलेश नसल्याची स्थिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती आणि दंडाच्या उपाययोजना अपुऱ्या ठरत आहेत. नागरिकांच्या मनातून कोरोनाचे भय संपल्याने कुठेही गांभीर्य नाही अशी स्थिती वाढत्या कोरोनाच्या स्थितीत धोक्याची घंटा होऊ नये. पोलिसांनी विनामास्क दंडवसुलीचे उपाय केले. त्यात कोट्यवधींचा दंड वसूल झाला, तरी विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या घटलेली नाही. कोट्यवधींचा दंड करूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

कोरोनाबाबत जनजागृती करून आणि दंड आकारूनही उपयोग होताना दिसत नाही. कोट्यवधींचा दंड आकारूनही त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. कोरोनाचे संकट वाढवून लॉकडाउनचे संकट वाढवून घेत आहोत. त्यामुळे आता 
टप्प्याटप्प्याने निर्बंध कठोर करीत जाणे किंवा थेट लॉकडाउन हे दोनच पर्याय आहेत. परिस्थिती सुधारते की बिघडते यावर सगळे अवलंबून राहील. 
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक