काळजी घ्या! कोरोना बाधीतात तरुण, मध्यमवर्गीय सर्वाधीक; पालिकेच्या अहवालात खुलासा

नाशिक : कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका साठ वर्षांपुढील जेष्ठांना असल्याने त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात असले तरी शहरात आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये युवकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पालिकेच्या कोव्हीड-१९ अहवालातून स्पष्ट झाले आहे. २१ ते ३० आणि वर्षे ४१ ते ५० वयोगटात सर्वाधिक म्हणजे बारा हजारांपेक्षा अधिक कोरोना बाधित आहे. 

रोगप्रतिकार शक्ती सक्षम असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते किंवा कोरोना संसर्ग झाल्यास आजारातून रुग्ण लवकर बरा होतो असे जागतिक आरोग्य संघटनेने मत व्यक्त केले होते. शास्त्रीय अंगाने विचार करता या तथ्य आहे. परंतू नाशिक शहरात आतापर्यंत कोरोना संसर्गाची लागण झालेल्या ६५,४६४ एकुण रुग्णांपैकी वीस ते ५० वयोगटातील ४६,३१८ रुग्णांचा समावेश आहे. शुन्य ते दहा वयोगटातील म्हणजेच लहानमुलांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. तर जेष्ठ नागरिकांपाठोपाठ अकरा ते वीस वयोगटातील ५,६९७ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.  कोरोना बाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण ५२.०३ टक्के तर महिलांचे प्रमाण ४७.९७ टक्के आहे. एका पॉझिटिव्ह रुग्णामागे २९.२७ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तपासण्यात आले. एकुण ८९३ मृत्युपैकी ६३९ पुरूष तर २५४ महिला आहेत. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

अतिआत्मविश्‍वास नडला 

युवकांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक असण्यामागे अतिआत्मविश्‍वास असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आपल्याला काहीचं होणार नाही यामुळे युवकांनी कोरोना संसर्गा पासून वाचण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क परिधान न करणे, दुचाकींवर डबलशीट फिरणे, सहा फुट अंतराचा नियम न पाळणे हि कारणे युवकांमध्ये कोरोनाची लागण होण्यामागे असल्याची सांगितली जात आहे. 

वयोगटानुसार कोरोना बाधित 
वयोगट कोरोना बाधित 
०-१० ३,२०० 
११-२० ५,६९७ 
२१-३० १२,१०२ 
३१-४० ११,७०५ 
४१-५० १२,१३२ 
५१-६० १०,३७९ 
६१ पेक्षा अधिक ७,३७६ 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता