नाशिक : काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपणाला माहीतच आहे.
माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळण्याकरिता बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. "देव्हाऱ्यात जनावरांना जायला परवानगी आहे परंतु दलितांना का नाही. आम्हीही माणसेच आहोत." हा संदेश देण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक मंदिर सत्याग्रह केलेली आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
काळाराम मंदिर सत्याग्रह
काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. हा लढा २ मार्च १९३० ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. बाबासाहेबांचे जवळचे सहकारी असलेले नाशिकचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी हा सत्याग्रह सातत्याने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. हा मंदिर प्रवेश लढा भारतीय इतिहासातील मोठा लढा समजला जातो.
समानतेचा अधिकारासाठी संघर्ष
काळाराम मंदिर सत्याग्रह हा देव दर्शनासाठीचा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी मंदिर प्रवेशाचा तो संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मूर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू बाबासाहेबांच्या चळवळीमागे होता.
पर्वती मंदिर सत्याग्रह
हा पुण्यातील पर्वती मंदिर प्रवेशासाठी इ.स. १९२९ मध्ये केला गेलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह होता. पुण्यातील 'पर्वती टेकडीवरील मंदिर' हे अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा अमरावती नंतरचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील आंबेडकरांच्या वतीने एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्रर्टने अर्ज फेटाळला. यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम.एम.जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित हजारों स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.
अंबादेवी मंदिर सत्याग्रह
अमरावती येथील प्राचीन 'अंबादेवी मंदिरात' प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून इ.स. १९२७ रोजी सुरू झाला होता. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.
हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठी सत्याग्रह
हिंदू धर्मातील ईश्वरांची पूजा करण्यासाठी बहुसंख्य दलितांचा अधिकार नाकारला जाई. कारण अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरे बाटतील, सामाजिक अनर्थ घडेल अशी समजूत होती. ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती. मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे चवदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला. त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठीही करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.
हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..
हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काळाराम मंदिर सत्याग्रह | इ.स. १९३१ - ३५ |
एम.एम. जोशी यांचा पर्वती मंदिर सत्याग्रह | इ.स. १९२९ |
डॉ. पंजाबराव देशमुख यांचा अमरावती अंबादेवी मंदिर सत्याग्रह | इ.स. १९२८ |
साने गुरुजी यांचा पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सत्याग्रह | इ.स. १९४७ |
भंगीकाम करणाऱ्या २०० दलित महिलांचा काशी विश्वनाथ मंदिरात (पहिल्यांदाच) प्रवेश आणि पूजा | २० जून २०११ |
अस्पृश्य महिलांचा राजस्थानच्या नाथद्वारा मंदिरात प्रवेश | इ.स. १९८८ |
अस्पृश्य महिलांचा ओरिसामधील जगन्नाथ मंदिरात प्रवेश | २००६ |
गढवालमधल्या जौनसर बावर तालुक्यातील परशुराम राम मंदिरात महिलांना व अस्पृश्यांना प्रवेश; (४०० वर्षे असा प्रवेश नव्हता) | १६ जानेवारी २०१६ |