काळ्या मातीत घाम गाळून यश गाठणारी ‘हिरकणी’! आदर्श शेतकरी संगीता सांगळेला शासनाचा पुरस्कार जाहीर 

येवला (जि.नाशिक) : काळ्या मातीत राबून काबाडकष्ट करत यशाला आपलेसे करण्याची एखाद्या महिलेची धडपड दखलपात्रच म्हणावी लागेल. शेतीत आदर्श उदाहरण ठरलेल्या सत्यगाव येथील संगीता सांगळे या हिरकणीच्या कष्टाची दखल घेत शासनाने त्यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. 

काळ्या मातीत घाम गाळणारी कृषिभूषण जिजामाता! 
शेतीचे नेतृत्व करून इतर महिलांपुढे आदर्श उभ्या करणाऱ्या या योगदानाची दखल कृषी विभागाने घेऊन दोन वर्षांपूर्वी आदर्श महिला शेतकरी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. कृषी विभागाने २०१९ मधील पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली असून, यात संगीताताईंचे नाव त्यांच्या कामामुळे अपेक्षितपणे समाविष्ट झाल्याने योग्य महिलेचा सन्मान झाल्याच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत. 

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

‘यशस्वी महिला शेतकरी’ हा बहुमान
सत्यगाव म्हणजे नांदूरमध्यमेश्‍वर एक्स्प्रेस कालव्याखाली पुरेसे पाणी असलेले गाव. पती वाल्मीक सांगळे यांच्या सहकार्याने संगीताताई यांनी पीकपद्धतीत बदल घडवून ‘यशस्वी महिला शेतकरी’ हा बहुमान मिळवला. आपल्या पाच एकर शेतीत त्यांनी स्वतः शेतीकामाचे नियोजन करून अद्ययावत पिके व शेतीची रचना करत उत्पन्नाला नवे रूप मिळवून दिले आहे. साचेबद्ध शेतीच्या पलीकडे जाऊन पती व त्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेतला आणि एकात्मिक फलोत्पादन योजनेतून शेतात पेरू आणि डाळिंबाची लागवड केली. विशेष म्हणजे त्याच्यात आंतरपीक म्हणून शेवगा आणि लाल भोपळादेखील लावला. पती वाल्मीक सांगळे यांनी योजनांचा अभ्यास करत कृषी विभागाच्या सहकार्याने पुन्हा पॉलिहाउससाठी अनुदान मिळवत संगीताताईंच्या मदतीने त्यात काकडी आणि मिरचीचे पीक घेतले. 

स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतात फवारणीसह मशागत
‘शेती बदलते आहे म्हणजे स्वतःही बदलले पाहिजे’ या तत्त्वाने त्यांनी नवे तंत्रज्ञानही अवगत केले. शेतात सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन सुविधा करून घेत त्या स्वतः हाताळत आहे. शेती विस्तारत असताना मजुरांची टंचाई भेडसावू लागल्याने पुढे पुन्हा एकदा कृषी विभागाची मदत घेत उन्नत शेती अभियानातून शेतीसाठी अनुदान मिळवत त्यांनी एक हॉर्सपॉवरचा ट्रॅक्टरही घेतला आहे. त्या स्वतः ट्रॅक्टर चालवत असून, त्याद्वारे शेतात फवारणीसह मशागत करू लागल्या आहेत. यामुळे साहजिकच मजुरीचा खर्च वाचून उत्पन्नात वाढ झाली आहे. घरकाम, मुलांचा अभ्यास पाहून शेताची वाट धरलेल्या संगीताताई सायंकाळपर्यंत शेतात काम करून पुन्हा सायंकाळी घरची कामेही नियमितपणे करत असतात. त्यांच्या शेतात ऊस, पेरू, डाळिंब, शेवगा, लाल भोपळा, द्राक्ष, कोबी, ब्रोकली फ्लॉवर ही पिके असून, या पिकांच्या देखभालीसह मशागतीत पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या जबाबदारीने काम करत आहेत. आत्मा योजनेतून चार गायीही त्यांनी घेतल्या आहेत. गायीचा चारा-पाणी व दूध काढण्यासह पिकांची लागवड, मशागत, विक्री, हिशेब या सर्व प्रक्रियेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. 

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

‘आदर्श महिला शेतकरी’ पुरस्कारानेही गौरव

प्रगतिशील शेतकरी म्हणून या महिलेने उमटवलेला ठसा तालुक्यासाठी अभिमानाचा ठरत आहे. राज्य शासनाच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या लोकप्रिय मासिक ‘लोकराज्य’च्या मुखपृष्ठावर त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध होऊन गौरव करण्यात आला आहे. तर मागील महिन्यात शासनाच्या कृषी महोत्सवात त्यांचा ‘आदर्श महिला शेतकरी’ पुरस्कारानेही गौरव झाला असून, जगावेगळ्या कामगिरीमुळे राज्यातील महिलांसमोर त्यांनी महिला काहीही करू शकतात, हे दाखवून देत आदर्श निर्माण केला आहे. यामुळे कृषी विभागाने त्यांच्या कार्याची दखल घेत जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. लवकरच शासकीय कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 

 

सर्वसामान्य कुटुंब असल्याने आपणही पती सोबत आपले ज्ञान व कष्ट घेऊन शेतीत नवीन काहीतरी करू या हेतूने मी सर्व जबाबदारी पार पाडत आहे. शासनाच्या योजनांची मदत मिळाल्याने अधिकाधिक उत्पन्न घेणे सोपे गेले. मनापासून केलेल्या कोणत्याही कामाला अपयश येत नाही हेच मी शेतीतून अनुभवत आहे. माझ्या कामाची राज्यस्तरावर दखल घेतल्याने मनस्वी आनंद झाला आहे. - संगीता सांगळे, प्रगतशील शेतकरी, सत्यगाव