कुंभमेळ्याचे तपोवन बनलाय मद्यपींचा अड्डा; तरीही प्रशासनाचे मात्र दुर्लक्षच

पंचवटी : पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तपोवन परिसर गत काही दिवसांपासून व्यसनी, मद्यपींचा अड्डा बनला आहे. मनपाने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या रामसृष्टी उद्यानाचा ताबा प्रेमीयुगुलांनी घेतल्याने हे ठिकाण खास चाळे करण्यासाठीच बनविले तर नाही ना, अशी शंका येते. 

रामसृष्टी उद्यान प्रेमीयुगुलांना आंदण दिल्याची स्थिती 

धार्मिक महत्त्व मोठे असल्याने गोदाकाठच्या तपोवनात देशभरातील धार्मिक पर्यटकांची पावसाळ्यातील काही महिन्यांचा काळ वगळता वर्षभर मोठी वर्दळ असते. याठिकाणी गोदावरी कपिला संगम असून, काही प्राचीन मंदिरेही आहेत. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या या भागाची म्हणूनच मोठी मोहिनी आहे. मात्र, गत सात-आठ महिन्यांपासून या भागात अक्षरशः संचारबंदीसारखे वातावरण होते. आता हळूहळू पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. परंतु त्यांना याठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, प्रेमीयुगुलांचे चाळे हेच आढळून येते. 

पोलिस ठाणे तीन किलोमीटरवर 

तपोवन परिसर आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. हे ठिकाण पोलिस ठाण्यापासून किमान अडीच तीन किलोमीटर दूर असल्याने मद्यपी व गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर मद्याच्या बाटल्या आढळून येतात. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर ओल्या पार्ट्या होत असल्याचे येथे वास्तव्यास असलेल्यांचे म्हणणे असून, याकाळात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी आहे. 

धोकादायक तुटका पूल 

२००३ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी गोदावरीच्या उजव्या तटावर सुंदर असे राम, लक्ष्मण व सीतेचे सुंदर असे शिल्प तयार करण्यात आले होते. याशिल्पाकडे जाण्यासाठी नदीपात्रातील अरुंद जागी लोखंडी पूल उभारण्यात आला होता. मात्र ऊन, वारा, पावसाच्या माऱ्यात कमकूवत झालेला पूल दुर्घटना नको म्हणून मध्यंतरी काढून टाकण्यात आला आहे. मात्र तरीही अनेक पर्यंटक जीव धोक्यात घालून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या पुलाची पुन्हा निर्मिती व्हावी, अशी मागणी आहे. 

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

रामसृष्टीवर लक्ष कुठे? 

नाशिक पूर्वचे माजी आमदार बाळासाहेब सानप आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी नगरसेवक, उपमहापौर, महापौर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या व महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या रामसृष्टी उद्यानाची पूर्णपणे वाट लागली असून, या ठिकाणाचा ताबा प्रेमीयुगुलांनी घेतल्याचे दिसून येते. वर्दीचा धाकच नसल्याने सायंकाळनंतर मध्यपीही मोठ्या संख्येने जमतात.  

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या