कुख्यात गटऱ्यासह दोघे स्थानबद्ध; धडक कारवाईत सराईतांकडून डझनभर हत्यारे जप्त

नाशिक : पोलिस आयुक्तांनी शहरात दोन दिवसांत वेगवेगळ्या सराईत गुन्हेगारांविरोधात मोहिमा राबवत दोघांना स्थानबद्ध केले. एकावेळी ठिकठिकाणी १५ छापे टाकून सहा सराईतांना एक गावठी कट्टा, दोन काडतूस, चार कोयते, दोन तलवारी, दोन चॉपर असे डझनभर हत्यार हस्तगत केले. कॉलेज रोड परिसरातील कुख्यात सराईत गटऱ्यासह दोघांना पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.

गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुनील ऊर्फ गटऱ्या नागू गायकवाड (३१, सिद्धार्थनगर झोपडपट्टी, बॉइज टाऊन शाळेजवळ) तसेच भारतनगर परिसरातील वसीम अब्दुल रहेमान शेख (३२, नंदिनीनगर, भारतनगर) या दोघांना गुरुवारी (ता.१८) पोलिस आयुक्तांनी स्थानबद्ध केले. 

अनेक प्रकारचे गुन्हे दाखल

गटऱ्याची कॉलेज रोड परिसरात मोठी दहशत आहे. लोकांना उचलून आणणे, रात्री-अपरात्री महिलांच्या सार्वजनिक शौचालयाजवळ टेबल टाकून दारूच्या पार्ट्या करण्यासह महिलांना धमकावत त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ करणे, शस्त्राचे धाक दाखवून लूटमार मारहाणीच्या अनेक तक्रारी आहेत. यापूर्वी त्याच्यावर गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी, वावी, अंबड पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. लूटमार, दरोडे, लोकांच्या घरांना आगी लावून देणे, अपहरण, महिलांचे विनयभंग असे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. दुसरा सराईत वसीम अब्दुल रहेमान शेख याच्याविरुद्ध मुंबई नाका, भद्रकाली, अंबड, इंदिरानगर, नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखले आहेत. दरोडे, शस्त्राच्या धाकाने लूटमार, घरफोड्या, धाकडपशा, शांतता भंगाच्या अनेक तक्रारी त्याच्याविरुद्ध आहेत. 
 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

डझनभर हत्यार जप्त 

शहरात एकावेळी तीन उपायुक्त, सहा सहाय्यक आयुक्त, १७ पोलिस निरीक्षक, ३८ उपनिरीक्षक, २०६ पोलिस अंमलदार आणि ३५ महिला अंमलदार असा फौजफाटा रस्त्यावर उतरवून सहा सराईत शस्त्रांसह ताब्यात घेतले. अकबर ऊर्फ भुऱ्या सत्तार शेख (रसुलबाग, खडकाळी), किशोर वाकोडे (कोळीवाडा, कथडा), निखिल ऊर्फ निक्कू बेग (कथडा, भद्रकाली), प्रवीण रामदास कुमावत (क्रांतिनगर, मखमलाबाद रोड), मदन मारुती पवार (नवनाथनगर, पेठ रोड), हृषीकेश अशोक निकम (मालधक्का रोड, नाशिक रोड) यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन कोयते, दोन तलवारी, एक चाकू, एक चॉपर असे डझनभर हत्यारं जप्त केले. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय