कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्जाची १६ पर्यंत मुदत 

नाशिक : कृषी अभ्यासक्रमांच्या बहुप्रतीक्षित प्रवेशप्रक्रियेलाही गती मिळाली आहे. याअंतर्गत कृषी शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षाला प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेशप्रक्रियेला बुधवारी (ता. ९) सुरवात झाली असून, ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे. राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठांतील प्रवेश या प्रक्रियेमार्फत होणार आहेत. दरम्यान, नवीन वर्षात ११ जानेवारीपासून वर्ग सुरू होणार आहेत. 

राज्‍यातील चार कृषी विद्यापीठांत प्रवेशप्रक्रिया सुरू
प्रवेशासंदर्भातील सविस्‍तर दिशानिर्देश जारी केले आहेत. त्‍यानुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज व आवश्‍यक कागदपत्रे स्‍कॅन स्‍वरूपात संकेतस्‍थळावर अपलोड करण्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत मुदत असेल. २० डिसेंबरला अंतरिम गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर ऑनलाइन तक्रार नोंदणीसाठी २१ व २२ डिसेंबरपर्यंत मुदत असेल.

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

११ जानेवारीला भरणार वर्ग 

अंतिम गुणवत्तायादी २५ डिसेंबरला, तर पहिल्‍या प्रवेश फेरीची वाटप यादी २७ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. यातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २८ व २९ डिसेंबरची मुदत असेल. दुसऱ्या प्रवेशफेरीच्‍या वाटप यादीची प्रसिद्धी ३१ डिसेंबरला केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी १ व २ जानेवारीची मुदत असेल, तसेच तिसऱ्या प्रवेशफेरीच्‍या वाटप यादीची प्रसिद्धी ५ जानेवारीला केली जाईल, तर प्रवेशासाठी ६ व ७ तारखेची मुदत असेल. 
त्यानंतर जागेवरील प्रवेशफेरीचा तपशील ९ जानेवारीला उपलब्‍ध करून दिला जाईल. ११ ते १५ जानेवारीदरम्‍यान या फेरीचे प्रवेश पार पडतील. संस्था ‍स्‍तरावरील मॅनेजमेंट कोट्याच्‍या जागांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया थेट जानेवारीत होणार आहे. 

मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश जानेवारीत 
सध्याच्‍या वेळापत्रकानुसार संकेतस्‍थळावर महाविद्यालयनिहाय उपलब्‍ध जागांची प्रसिद्धी १२ जानेवारीला केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयाकडे व्‍यक्‍तिशः प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्याची मुदत १४ व १५ जानेवारी असेल. महाविद्यालयाच्‍या संकेतस्‍थळावर आणि सूचनाफलकावर निवडयादी १६ जानेवारीला जारी केली जाईल, तर प्रवेशासाठी १७ व १८ जानेवारीची मुदत असेल. वर्ग सुरू होण्याची तारीख ११ जानेवारी निश्‍चित करण्यात आली आहे. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले

हे आहेत अभ्यासक्रम 
महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (रत्‍नागिरी) या विद्यापीठांत उपलब्‍ध असलेल्‍या पदवी अभ्यासक्रमाला या प्रवेशप्रक्रियेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जातील. यात बी.एस्सी. शिक्षणक्रमातील कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, मत्‍स्‍यविज्ञान, बी.टेक. अभ्यासक्रमांतर्गत कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन या शाखांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत.