Site icon

कृषी यांत्रिकीकरणात नाशिक विभाग राज्यात अव्वल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कृषी यांत्रिकीकरण योजनेत 1 एप्रिल 2022 आतापर्यंत एकूण 14 हजार 191 शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत विविध कृषी यंत्र व अवजारांसाठी 75.45 कोटी अनुदान स्वरूपात वितरित करण्यात आले आहे. महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेत नाशिक विभाग राज्यात अव्वल ठरत आहे, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली.

कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण या योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम राबविण्यास सन 2020 पासून सुरुवात केलेली आहे. सन 2022-23 मध्ये या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी उपयोगी असलेली विविध यंत्रे, अवजारे यासाठी अनुदान देण्यात येत आहेत.

कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य

ट्रॅक्टर, पॉवरट्रेलर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर (हायड्रोलिक), पल्टी नांगर, ट्रॅक ट्रॉली, मिनी दाल मिल, कम्बाइन हार्वेस्टर, रिपर कमबाइंडर (ट्रॅक्टरचलित), मिनी राइस मिल इत्यादी यंत्रे व औजारे या योजनेतून देण्यात येतात. या योजनेचा लाभ अनुसूचित जमाती, अनु. जाती, सर्वसाधारण शेतकऱ्यांना देण्यात येतो.

अवजारे/ यंत्रांची क्षेत्रीय तपासणी, मोका तपासणी करून सर्व कागदपत्रे विहीत मुदतीत सादर केली असल्यास पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदान वितरित करण्यात येते . सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पारदर्शकपणे कमी वेळेत पार पाडली जाते. ऑनलाइनमध्ये कोणतीही अडचण आल्यास कृषी विभागाच्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोहन वाघ यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post कृषी यांत्रिकीकरणात नाशिक विभाग राज्यात अव्वल appeared first on पुढारी.

Exit mobile version