कृषी विद्यार्थ्यांचे सेंद्रिय शेतीचे प्रयोग! ग्राहकांच्या मागणीनुसार पिकांची निवड 

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : सध्या सर्वत्र शेतीत नवनवे प्रयोग केले जात आहेत. याच धर्तीवर विषमुक्त शेतीकडे हळूहळू लोक वळत आहेत. कृषी शिक्षणाचे धडे गिरविणारे अनेक विद्यार्थी यात यशस्वी होत आहेत. येथील एचएच श्री श्री मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी सेंद्रिय शेतीचे प्रयोग यशस्वी केले. 

दीड एकरावर विद्यार्थ्यांच्या मदतीने सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे प्रकल्पाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. दर आठवड्याला आढावा घेतला जातो. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रक्षेत्रावर कामाचे नियोजन, व्यवस्थापन केले जाते. ग्राहकांच्या पसंती व मागणीनुसार पिकांची निवड, बारमाही पिके उपलब्ध होतील यादृष्टीने १५ ते २० दिवसांच्या अंतराने पीकलागवड करतात. 

हंगामाच्या सुरवातीला जमिनीत शेणखत टाकले. महाविद्यालयाच्या परिसरात उद्यानविद्या महाविद्यालयाचा औषधी वनस्पती प्रकल्प असल्याने तेथून कडुनिंब, निरगुडी, सीताफळ, एरंड, धोतरा, बेशरम, घाणेरी यांच्या वापराने दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क बनविला जातो. डेरी विभागाकडे गोवंश असल्याने मुबलक प्रमाणात शेण व गोमूत्र उपलब्ध होते. त्याचाच वापर करून विद्यार्थ्यांकडून जीवामृत, अमृतपाणी, पंचगव्या, एनरीच पंचगव्या, अन्नद्रव्यांच्या स्लरी, नाडेफ कंपोस्ट, गांडूळखत, व्हर्मिवॉश तयार करून त्याचा वापर पिकाला अन्नद्रव्ये पुरविण्यासाठी केला जातो. प्रक्षेत्रावर विहिरी, बोअरवेल असल्याने पिकांना गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो. पाणी शुद्ध व क्षारमुक्त होण्यासाठी सॅन्ड फिल्टर्सचा वापर केला जातो. भाजीपाला ग्राहकांच्या मागणीनुसार, रंग, चव यावरून हवा तेवढा टप्प्याटप्प्याने काढला जातो. माल काढणीवेळी स्वच्छता, गुणवत्ता, पॅकिंग यावर विद्यार्थ्यांकडून विशेष काळजी घेतली जाते. लागवडीपूर्वी भाजीपाला बियाण्यास बीजामृत व ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया केली जाते. वीस गुंठे यानुसार संपूर्ण प्रक्षेत्रावर किडीनिहाय चिकट सापळे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे यांचा प्रभावी वापर केला जातो. जैविक कीडनाशक व बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या जातात. सेंद्रिय शेती प्रकल्पात पूजा बच्छाव, कोमल डांगे, चेतना रायते, समीक्षा पवार, दीक्षिता हिरे, सूरज गायकवाड, संदीप कदम, राकेश चव्हाण, रूपेश पवार, प्रसाद बोरसे, विकास जाधव, कृष्णा वाघ, सुहास नाईकनवरे, निखिल रसाळ यांचा सहभाग आहे. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

-फळवर्गीय- वांगी, भेंडी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर व गवार 
-वेलवर्गीय : कारली, गिलके, भोपळा, डांगर व टरबूज 
-मूळवर्गीय : मुळा, गाजर, बीट व लसूण 
-पालेवर्गीय : मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक 
-सेंद्रिय शेतीचा भाजीपाला दिसायला आकर्षक, विषमुक्त, चवीला रुचकर - महाविद्यालयाच्या परिसरात स्टॉल लावून भाजीपाला विक्री 

कोरोनाच्या परिस्थितीमुळे सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला विषमुक्त भाजीपाला खाणे उत्तम पर्याय आहे. महाविद्यालयात या शेतीचा पर्याय म्हणून आम्ही निवड केली. संपूर्ण सेंद्रिय, जैविक पद्धतीने उभ्या केलेल्या या प्रकल्पाचा भविष्यात विस्तार केला जाईल. 
-डॉ. पंकज सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर कृषी अनुभवातून शिक्षण या संकल्पनेतून सेंद्रिय भाजीपाला लागवड करून त्याची विक्री व्यवस्था सुरू केली आहे. येणाऱ्या काळात वर्षभर भाजीपाला, फळे उपलब्ध असतील असे प्रयत्न केले जातील. 
-डॉ. सतीश राऊत, प्राचार्य