कृषी सिंचन योजनेच्या निधीवाटपात दुजाभाव! सर्वाधिक अर्ज येवल्यातून

येवला (जि.नाशिक) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील लाभार्थ्यांना तालुकानिहाय सुमारे १७ कोटींचे निधीवाटप निश्‍चित झाले आहे. आलेल्या अर्जांच्या तुलनेत तालुक्यांना निधी देणे अपेक्षित असताना सर्वाधिक अर्ज दाखल होऊनही दुष्काळी येवल्याला मात्र त्या तुलनेत कमी निधी मिळाला आहे. अनुसूचित जाती-जमातीचे अर्ज कमी असल्याने ही तफावत दिसत असली तरी एकूण अर्जसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर निधी कमी मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यात तालुकानिहाय १७ कोटींचे वाटप; सर्वाधिक अर्ज येवल्यातून 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या लाभासाठी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार तालुकानिहाय लक्ष्यांक प्राप्त झाला असून, त्यानुसार निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी वितरण करताना एकूण अर्जांचा विचार न करता अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण व दिव्यांग अशी चार गटांत वर्गवारी केली आहे. निधीदेखील या घटकांतून आलेल्या आजच्या प्रमाणेच वितरित झाला आहे. एकीकडे पाणीटंचाईमुळे ठिबक व तुषार सिंचनाला मोठी मागणी वाढली आहे. पाण्याची बचत होऊन कमी पाण्यात रब्बी व उन्हाळी पिके घेणे शक्य होत असल्याने दुष्काळी तालुक्यातून तर यासाठी मोठी मागणी असल्याने जिल्ह्यातून १४ हजार ४१८ अर्ज पोर्टलवर प्राप्त झाले होते. यात सर्वसाधारण गटाचे १२ हजार ७४८ अर्ज आहे, तर एकूण अर्जांपैकी एकट्या येवल्याचेच तीन हजार २१६ अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, या अर्जांच्या तुलनेत येवल्यासाठी दोन कोटी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. याउलट मालेगावमध्ये एक हजार ५५३ अर्ज आले असून, त्यांना दोन कोटी १४ लाखांचा निधी दिला गेला आहे.

लक्ष्यांक व निधीवाटपाचे आदेश

अर्थात, अनुसूचित जाती, जमातीची अर्जसंख्या अधिक असल्याने हा निधी अधिक मिळाला आहे. या निकषामुळे सर्वाधिक अर्ज असूनही येवला, चांदवड, निफाड, सिन्नर आदी तालुक्यांवर सर्वसाधारण प्रवर्गातील सर्वाधिक अर्ज असल्याने कमी निधी मिळाल्याचे दिसते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी या संदर्भातील लक्ष्यांक व निधीवाटपाचे आदेश काढले आहेत. 

पालकमंत्र्यांना साकडे... 
या निधीवाटपात येवला तालुक्यासाठी दोन कोटी २५ लाख रुपये मिळाले आहेत. इतर तालुक्यांच्या तुलनेत लाभार्थी अर्जाचा विचार करता ही रक्कम फारच कमी असून, वाढीव रक्कम मिळण्याची मागणी बाजार समितीचे माजी संचालक मकरंद सोनवणे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील अर्जांचा विचार करता २२ टक्के अर्ज एकट्या येवल्यातूनच दाखल झाले आहेत. म्हणजेच चार कोटींचा निधी मिळणे अपेक्षित असताना तो निम्म्याने कमी मिळाला आहे. त्यामुळे अर्जांच्या तुलनेत निधी मिळावा, अशी मागणी सोनवणे यांनी भुजबळांकडे केली आहे. 

अर्ज व निधीचे आकडे... 
तालुका - अर्जसंख्या - वाटप निधी 
बागलाण - १,३९५ - १ कोटी ८० लाख 
चांदवड - १,७१४ - १ कोटी ९२ लाख 
देवळा - ५२१ - ६२ लाख ७५ हजार 
दिंडोरी - ९१३ - १ कोटी ३७ लाख 
इगतपुरी - ८२ - १५ लाख ५९ हजार 
कळवण - ४२९ - ७६ लाख ७४ हजार 
मालेगाव - १,५५३ - २ कोटी १४ लाख 
नांदगाव - ८३० - ८० लाख ४८ हजार 
नाशिक - ३२५ - ४६ लाख ७९ हजार 
निफाड - १,५६९ - १ कोटी ७६ लाख 
पेठ - १८० - ५४ लाख 
सिन्नर - १,३६८ - १ कोटी ४५ लाख 
सुरगाणा - १९१ - ५४ लाख १८ हजार 
त्र्यंबकेश्वर - १३२ - ३४ लाख ४३ हजार 
येवला - ३,२१६ - २ कोटी २५ लाख 
एकूण ः १४,४१८ - १६ कोटी ९७ लाख