कृष्ण-मिराची ‘पैठणी’ ठरतेय लक्षवेधी! येवल्यातील राजवस्त्राला नवे रूप 

येवला (जि.नाशिक) : देश-विदेशात नावलौकिक असलेल्या येथील पैठणी व साडी व्यवसाय शहराचा अर्थकणा बनला असून, येथील विणकरांनी पैठणीला अस्सल सौंदर्याचे देखणेपण मिळवून दिले आहे. या भरजरी वस्त्रकलेचा एक उत्कृष्ट पारंपरिक प्रकार म्हणजे पैठणी. याच राजवस्त्राला अजून नवे रूप मिळवून देत प्रथमच कृष्ण-मीरा यांची छबी पैठणीवर साकारली आहे. 

कलाकारीने या वस्त्राचे रूप अधिकच देखणे
जगविख्यात असलेल्या येवल्याच्या या पैठणीवर विविध देव-देवता, निसर्गसौंदर्य साकारण्यात आले आहे. येथील काही हौशी तरुण विणकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिर्डीचे साईबाबा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आदींची प्रतिमा पैठणीवर साकारली होती. एका विणकराने हरीण, जिराफची चित्ररूपी पैठणी साकारली होती. येथील वसीम सय्यद मुस्लिम पैठणी कारागिराने आपल्या कलाकुसरीतून पैठणीच्या पदरावर राधा-कृष्ण झोका खेळत असतानाचे चित्र साकारले आहे. त्याच्या या कलाकारीने या वस्त्राचे रूप अधिकच देखणे झाले आहे. आता येथील सुनील कोकणे यांनी नवी पैठणी विणत कृष्ण-मीरा यांची छबी साकारली आहे. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

येवल्यातील राजवस्त्राला नवे रूप 
शहर पैठणीसाठी सर्वदूर प्रसिद्ध असून, या ठिकाणी विविध प्रकारच्या पैठणी तयार केल्या जातात. फॅशनेबल होणाऱ्या काळाला सोबत करून आता विणकर नावीन्यपूर्ण व कुणालाही मोहात पाडेल इतकी देखणी कलाकृती साकारत आहेत. 

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.

मनमोहक पैठणीचे सर्वत्र कौतुक 
यापूर्वी पैठणीवर विविध प्रकारचे संदेश, देखावे, चित्र पैठणी कारागिरांनी आपल्या हाताने विणकाम करून साकारले आहेत. मात्र, सुनील कोकणे यांनी प्रथमच कृष्ण व मीराची छबी विणलेली साडी लक्ष वेधून घेत आहे. ही पैठणी तयार करायला कोकणे यांना दीड महिन्यांचा कालावधी लागला. यापूर्वी कोकणे यांनी हरणांचा कळप, तसेच राधा-कृष्णाची छबी असलेली पैठणीदेखील साकारली आहे. सध्या या मनमोहक पैठणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.