
दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
देशातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हीलेज होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण केले जाते. राज्यातून या अभियानामध्ये नाशिक जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींची यादी नुकतीच जाहीर झाली असून त्यात दिंडोरी तालुक्यातील गोंडेगावचाही समावेश केला गेला आहे.
महाराष्ट्र शासनाने सम्पूर्ण राज्यात स्वच्छ गाव सुंदर गाव, स्मार्ट गाव, निर्मलग्राम अशा विविध योजनांमार्फत समृद्ध ग्रामविकासाला गती दिली आहे. त्यात ग्रामपंचायत विकासाला विशेष प्राधान्य आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकासाच्या कार्याचे तटस्थपणे मूल्यमापन होऊन जिल्हा, राज्य आणि शेवटी केंद्रीय स्तरावर निवड केली जाणार आहेत. केंद्र सरकारच्या स्वच्छ गाव या मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातून तीन ग्रामपालिकांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. आठ दिवसांपूर्वी राज्यस्तरीय परीक्षण समितीने गावाला भेट देऊन पाहणी केली होती. स्वच्छता अभियान ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत राज्यस्तरावर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या तपासणी पथकाने नाशिक जिल्ह्याला नुकतीच भेट दिली. त्या भेटीमध्ये त्यांनी जिल्हा स्तरावरील निवड झालेल्या गावांची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हास्तरावरील निवड यादीत प्रथम क्रमांक पटकवलेल्या गोंडेगाव (दिंडोरी) ची पाहणी केली. त्यात गावाच्या स्वच्छतेचा दर्जा, सार्वजनिक शौचालयाचा वापर, वैयक्तिक शौचालयाचा वापर, घनकचरा व्यवस्थापनाचे काम, आरोग्याचे महत्त्व, ग्रामपंचायतीचे डिजिटलीकरण, शाळा व अंगणवाडी यांचा विकास, सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प या आणि इतरही बाबींची समावेश होता. ग्रामपंचायतीच्या कामकाजाबद्दल पथकाने समाधान व्यक्त केले. राज्यस्तरावर अहवालात त्यांनी गोंडेगावची उत्कृष्ट गाव म्हणून निवड केली. आता गोंडेगाव हे स्वच्छता अभियानामध्ये देश पातळीवर राज्यातून निवड होणाऱ्या गावांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. ही बातमी गावात येऊन धडकताच गावात नागरिकांनी आंनद व्यक्त केला. या उत्कृष्ट कार्याचे सारे श्रेय ग्रामस्थांनी उच्च विद्या विभूषित सरपंच लक्ष्मीताई भास्करराव भगरे, उपसरपंच शमीम पठाण, सदस्य संगीता भवर, रूपाली गांगुर्डे, पल्लवी भगरे, अजय गांगुर्डे, अनिल भगरे तसेच ग्रामसेवक नईम सय्यद, पाटील आणि बचत गटाच्या महिला ग्रामस्थ यांना दिले.
राज्यस्तरावर ग्रामपंचायतीने मिळविलेल्या यशाबद्दल विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय पाटील, जि.प. माजी सदस्य भास्कर भगरे, शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे आदींनी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
हे यश संपूर्ण गावाचे आहे. सर्व ग्रामस्थांनी काटेकोरपणे स्वच्छतेबाबत काम केले आहे. सर्व सहकारी सदस्य व या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, गटविकास अधिकारी नम्रता जगताप तसेच विस्तार अधिकारी, स्वच्छता अभियानचे सर्व कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
सरपंच लक्ष्मीताई भगरे
हेही वाचा :
- Heavy rainfall : उत्तराखंड, हिमाचलमध्ये पुन्हा पावसाचा कहर; मुसळधार पावसाने मुंबईलाही झोडपले
- पंतप्रधान मोदींच्या पुणे दौर्याची प्रशासनाकडून तयारी
- Brain effects of corona : कोरोनाच्या मेंदूवरील परिणामाविषयी नवे संशोधन
The post केंद्र सरकारच्या स्वच्छता पोर्टलवर गोंडेगावची निवड, नाशिक जिल्ह्यातून तीन गावांची निवड appeared first on पुढारी.