केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढला

केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव,www.pudhari.news

जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यामध्ये केळी पिकावर विषाणूजन्य सी.एम.व्ही रोगाने थैमान घातले आहे. कृषी विभागाकडून संसर्गजन्य केळी बागेचा सर्वे करण्यात आला आहे. अशावेळी स्वच्छता राखत शेती करण्याचे आव्हान कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

रावेर, मुक्ताईनगर तालुक्यानंतर आता यावल तालुक्यातील केळी पिकावर विषाणूजन्य रोगाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. केळी उत्पादक हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टिशू कल्चर केळी रोपांवर राबवण्यात येत असल्याने या रोगाची लागण होत असल्याचे उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे. महागडी रोपे घेऊन आता तीच उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यावल तालुक्यातील एका शेतकऱ्याने तब्बल चार हजार पाचशे रोपे उपटून फेकून दिली आहेत. या महागड्या रोपांवर आतापर्यंत अडीच लाख रुपये खर्च झाला होता. याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे.

बाधित झाड त्वरीत नष्ट करा…
जुलै ऑक्टोबर मध्ये पेरणी झालेल्या मृग विभागांवर हा रोग फोफावला आहे. यावर सध्या कोणतेही रोग प्रतिबंधक औषध नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रोगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. याबाबत, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यासाठी हा रोग नवा नाही. यावर योग्य त्या उपाययोजना केल्या तर हा रोग रोखला जाऊ शकतो.

रोपांवर येणारा मावा आणि पांढरी माशी यावर त्वरित उपाययोजना केल्यात तर हा रोग पसरणार नाही. याचबरोबर जर शेतातील कोणत्याही झाडावर हा रोग दिसून आला तर त्वरित ते झाड नष्ट केले पाहिजे. जेणेकरून हा रोग पसरणार नाही. याचबरोबर मावा आणि पांढरी माशी यावर लिंबाच्या अर्काचा फवारा केला तर हा रोग पसरणार नाही.

हेही वाचा :

The post केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढला appeared first on पुढारी.