कॉफी शॉपच्या नावाखाली सुरु होतं वेगळचं….; पोलिसांचे छापे

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; शहरातील सहा कॉफी शॉपवर सिन्नर पोलिस व नाशिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या कारवाई केली. या कारवाईनंतर कॉफी शॉपमधील किळसवाणे प्रकार समोर आले आहेत. पोलिसांच्या कारवाईत या कॉफी शॉपमध्ये शेकडो कंडोमची वापरलेली व न वापरलेली पाकिटे आढळून आली.

कॉफी शॉप म्हणजे अवैधरीत्या सुरू असलेले कुंटणखाणेच आहेत, अशी खात्री झाली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या चौदा चौक वाड्यातील सांगळे कॉम्प्लेक्समधील चार, बसस्थानक परिसरातील एक व पेट्रोल पंपाजवळील एका कॉफी शॉपवर सोमवारी (दि. १६) पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई करताना या कॉफी शॉपमधे अनेक अल्पवयीन तरुण-तरुणी पोलिसांना मिळून आले. त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले, तर पेट्रोल पंपाजवळील दिल दोस्ती कॉफी शॉपचा चालक भूषण लोणारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. चौदा चौक वाड्यातील आठवण कॉफी शॉप, व्हॉट्सअॅप कॉफी शॉप अशी नावे आहेत, तर बाकीच्या कॉफी शॉपला नावेच नव्हती, असेही कारवाईत समोर आले आहे. कारवाई करताना पोलिसांना अनेक कॉफी शॉपमध्ये कंडोमची शेकडो पाकिटे आढळून आली. त्यामुळे ही कॉफी शॉप

जणू कुंणखानेच बनले होते, याची खात्री झाली. सिन्नरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस हवालदार समाधान बोराडे, आप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे, शांताराम नाठे, दीपक आहेर, गिरीश बागूल, विनोद टिळे, भूषण रानडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. या कॉफी शॉपचालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बलात्काराच्या घटनेनंतर पोलिस ॲक्शन मोडवर

दोन दिवसांपूर्वी ‘दिल दोस्ती कॉफी शॉप मध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली. यात तीन आरोपींनी पीडितेवर अत्याचार करताना अश्लील चित्रफीत काढून ती सोशल मीडियावर व्हायरल केली. या प्रकरणी सिन्नर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची गंभीर दखल घेत सिन्नर पोलिस व नाशिक गुन्हे शाखेचे पथक अॅक्शन मोड मध्ये आले असून शहरातील सगळ्याच कॉफी शॉपवर कारवाई करत कॉफी शॉप उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

The post कॉफी शॉपच्या नावाखाली सुरु होतं वेगळचं....; पोलिसांचे छापे appeared first on पुढारी.