कोजागरी पौर्णिमा : गडावर हजारो कावडधारकांचे आगमन; आज रंगणार तृतीयपंथीयांचा मेळावा

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ ओळख असणार्‍या सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेसाठी हजारो कावडधारकांचे शनिवारी (दि. 8) आगमन झाल्याने गड गर्दीने फुलला होता. कोजागरी पौर्णिमेनिमित्त येथे तृतीयपंथीयांचा मेळावा भरणार आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे मंदिर बंद असल्याने व पावसाळ्यात मंदिर, मूर्ती संवर्धनाचे काम सुरू होते. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळली आहे. गंगा, यमुना, शिंपा, नर्मदा, गोदावरी, तापीसह विविध पवित्र नद्यांचे जल घेऊन मध्य प्रदेश, असलोद, नंदुरबार, धुळे, जळगाव, उज्जैन, इंदूर, त्र्यंबकेश्वर, शहादा, कल्याण, सिन्नर, धुळे आदी ठिकाणांचे भाविक मोठ्या श्रद्धेने गडावर दाखल झाले आहेत. गडावर अजूनही वरुणराजा बरसत असल्याने भक्तांची धावपळ होत आहे. गडावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रात्री 12 ला आई भगवतीला विविध ठिकाणांहून आणलेल्या नद्यांच्या जलाने अभिषेक करण्याची प्रथा आहे. पण नुकतेच मूर्तिसंर्वधनाचे काम पूर्ण झाल्याने या मूर्तीवर अभिषेक न करण्याचा निर्णय देवी संस्थानने घेतला आहे.

तृतीयपंथीयांचा मेळावा भरणार :
कोजागरी पौर्णिमाला तृतीयपंथीयांचा मेळावा भरण्याची प्रथा असून, या दिवशी गुरू आपल्या शिष्याला दीक्षा देण्याचा सोहळा साजरा करतात व आपल्या पंथामध्ये शिष्याला सामावून घेतात. वर्षभरातून गडावर सर्व तृतीयपंथीय एकत्र येत हा सोहळा साजरा करतात. साधारणत: महाराष्ट्रातील सर्व तृतीयपंथीय गडावर येतात. गडावर भगवतीच्या चरणी नतमस्तक होत आपले कार्य पार पाडून दुसर्‍या दिवशी आपापल्या गावांकडे परततात.

हेही वाचा:

The post कोजागरी पौर्णिमा : गडावर हजारो कावडधारकांचे आगमन; आज रंगणार तृतीयपंथीयांचा मेळावा appeared first on पुढारी.