‘कोबी’ ठरला मुक्या जनावरांसाठी काळ; अचानक ३२ मेंढ्यांचा मृत्यू

देवळा (जि.नाशिक) : कोबीच्या शेतात दिवसभर चरत असताना रात्री सर्व मेंढ्याचा कळप शेतात बसला होता. नंतर मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास यातील ३२ मेंढ्या अचानक मृत्युमुखी पडल्या. यामुळे नागरिकांत भितीचे वातवरण आहे,

३२ मेंढ्या अचानक मृत्युमुखी

दिघावे (ता. साक्री) येथील मेंढपाळ दगडू भुजा भोईकर व साहेबराव महादू टकले जवळपास पावणेतीनशे मेंढ्या घेऊन देवळा तालुक्यातील महालपाटणे परिसरात चारण्यासाठी आले होते. सोमवारी (ता. ८) या सर्व मेंढ्या शरद ठाकरे यांच्या कोबीच्या शेतात दिवसभर चरत असताना रात्री सर्व मेंढ्याचा कळप प्रताप ठाकरे यांच्या शेतात बसला होता. नंतर मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास यातील ३२ मेंढ्यांना विषबाधा झाल्याने मृत्युमुखी पडल्या. त्यांनतर येथून जवळच असलेल्या रनादेवपाडे परिसरात शिवराम भोईकर (रा. कजवाडे, ता. मालेगाव) यांच्या मालकीच्या दहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. या मृत पावलेल्या मेंढ्यांमध्ये जास्तीत जास्त गाभण मेंढ्या आहेत. घटनास्थळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू झांबरे यांनी भेट देऊन मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्याचे विच्छेदन केले.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

कोबी खाल्ल्याने विषबाधा

मेंढ्यांनी कोबी खाल्ल्याने विषबाधा झाल्याची माहिती डॉ. झांबरे यांनी दिली. शासनाने या गरीब मेंढपाळ कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महालपाटणे (ता. देवळा) येथे कोबी खाल्ल्याने ३२ मेंढ्या विषबाधा झाल्याने मृत्युमुखी पडल्या. या घटनेमुळे मेंढपाळाचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट