जुने नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. विविध सण धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. गर्दी टाळण्याच्या सूचनादेखील प्रशासनांकडून करण्यात आल्या आहेत. रंगपंचमीनिमित्त साजरा केला जाणारा रहाड उत्सवासला यंदा ब्रेक लागणार आहे. कुठेतरी रंगप्रेमींमध्ये नाराजी दिसून येत आहे. असे असले तरी सध्याची परिस्थिती बघता शासनाच्या सूचना आणि नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे रहाड मंडळाचे पदाधिकारी आणि रंगप्रेमींकडून सांगण्यात आले.
पेशवेकालीन परंपरा..
रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी रहाड उत्सव साजरा करण्याची शहरात पेशवेकालीन परंपरा आहे. पेशवेकाळात जुने नाशिक पंचवटीसह विविध भागात अनेक रहाडी तयार करण्यात आल्या आहे. दरवर्षी त्याभागातील रहाड मंडळांकडून होळीच्या पाचव्या दिवशी रंग खेळण्यासाठी रहाडी उघड्या केल्या जातात. शहरातील विविध भागातील नागरिक याठिकाणी येऊन रंग खेळण्याचा आनंद घेतात. पंचवटीतील शनिचौक आणि जुने नाशिकमधील तिवंधा चौकातील रहाडीवर सर्वाधिक रंगप्रेमीची गर्दी असते. अनेक जण रहाडीत उडी घेत रंगात न्हाऊन निघत असतात. त्यात महिलांचादेखील समावेश असतो. रंगप्रेमींकडून मोठ्या आतुरतेने रंगपंचमीची वाट पाहत असतात. अशा या पारंपरिक रहाड उत्सवावर यंदा कोरोनाचे संकट आहे.
हेही वाचा - स्वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी
परवानगीसाठी प्रयत्न करणार
प्रशासनांकडून कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी होणाऱ्या सर्वप्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. शुक्रवारी (ता.२) साजऱ्या होणारी रंगपंचमीस परवानगी मिळणे अशक्य आहे. रहाड मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. कोरोना नियमांचे पालन करून उत्सव साजरा केला जाईल. त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. शेवटी परिस्थिती बघता पोलिस, महापालिका, जिल्हा प्रशासनांकडून देण्यात आलेल्या आदेशाचेच पालन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ
रहाड उत्सव साजरा करण्यास परवानगी नाही मिळाली तर केवळ रहाडी पारंपरिक पूजा करण्यात येईल. तसेच, कोरोना नियमाचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करणार असून, तसेच सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करणार आहे.
- आदित्य पवार, रहाड मंडळाचे पदाधिकारी.