कोरोनाग्रस्त मातेने घरातच सोडला प्राण; एकटी लेक कारने घेऊन गेली स्मशानात, पाहा VIDEO

नाशिक : बेड मिळत नसल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाला कारमध्ये सलाइन लावण्याची वेळ आल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये आणखी एक घटना धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे जगण्याने छळले होते. मरणाने केली सुटका...असेही म्हणता येणार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. काय घडले नेमके?

एकटी लेक कारने घेऊन गेली स्मशानात
पंचवटीतील अमृतधाम परिसरातील उषा डिगंबर इंगळे (वय ७०) असे या मृत महिलेचे नाव आहे. त्या कोरोना पॉझिटिव्ह होत्या. त्यांना ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी त्यांच्या कन्या गायत्री यांनी चार पाच दिवसांपासून बरेच प्रयत्न करत होत्या. अनेकांना फोन करून ऑक्सिजन बेड मिळवून देण्याची विनवणी त्या करत होत्या. अखेर रविवारी मध्यरात्री या मातेने राहत्या घरातच अखेरचा श्वास घेतला. मात्र मृत्यूनंतरही त्या लेकीला आपल्या मातेच्या अंत्यसंस्कारासाठी झगडावे लागले.

चार तास प्रतीक्षा करूनही शववाहिका मिळाली नाही. अखेर या लेकीनेच आपली कार काढली आणि कारमध्येच मातेचा मृतदेह टाकून थेट स्मशानभूमीचा रस्ता धरला. अंत्यसंस्कारासाठी मृत्यूदाखला लागत असल्याने जातानाच आधी मेरी कोविड सेंटर गाठले. तिथून मृत्यूदाखला घेतला आणि पुढे पंचवटी अमरधाममध्ये त्या मातेवर अंत्यसंस्कार पार पडले. या धक्कादायक प्रकारामुळे महापालिका प्रशासनाच्या बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे

महापालिका प्रशासनाचे धिंडवडे
 तब्बल चार तास प्रतीक्षा करूनही अंत्यसंस्कारासाठी शववाहिकाही न मिळाल्याने एकट्या लेकीलाच कारमधून मृतदेह स्मशानात न्यावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाचे धिंडवडे निघाले आहेत