कोरोनाचा झटका शिवसेनेच्या नेत्यांनाही! नाशिकचे तीन बडे नेते कोरोनाबाधित;

नाशिक : कोरोनाचा प्रभाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. पण जाता जाता का होईना यामुळे नेत्यांना एक मोठा झटका दिला असंच म्हणावं लागेल. नाशिकमध्ये यापूर्वी बड्या नेत्यांमध्ये मंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, नरेंद्र दराडे, डॉ.राहुल आहेर, देवयानी फरांदे यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. मात्र आता यावेळेस शिवसेनेच्या तीन बड्या नेत्यांना याचा झटका बसला आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच कोरोनाची बाधा
 कोरोना विषाणूने नाशिकमधील शिवसेनेच्या नेत्यांनाही झटका दिला असून यामध्ये जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह नुकतेच भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेले सुनील बागूल यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समजते आहे. तर सुधाकर बडगुजर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जोरदार तयारी सुरू असतानाच, शिवसेनेचे करंजकर आणि बडगुजर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  भाजपसोडून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले सुनील बागूल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह थोडा थंडावला असल्याचे चित्र दिसत आहे.  या तिघांनीही आपल्या सपंर्कात आलेल्यांनाही कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

सर्वसामान्यांपाठोपाठ अनेक व्हीआयपींनाही कोरोनाने ग्रासले
नाशिकमध्ये सद्य:स्थितीत जिल्ह्यात एक हजार २७४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ७५ हजारांच्या पार गेला असून, कोरोनामुळे एक हजारापेक्षा अधिक बळी गेले आहेत. बागूल आणि करंजकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत, तर बडगुजर यांना तीव्र लक्षणे असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांची प्रकृती ठणठणीत असून, तुर्तास काळजी करण्याचे कारण नाही. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल