कोरोनाचा देशभरात उद्रेक! रुग्ण बरे होण्याचे  सर्वाधिक प्रमाण ‘महाराष्ट्रात’! 

नाशिक : देशात कोरोना विषाणू फैलावाच्या उद्रेकाने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडवलेली असताना सक्रिय, दैनंदिन रुग्णसंख्येच्या जोडीला कोरोनाग्रस्तांचा मृत्यू ही डोकेदुखी बनलेल्या महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळाला आहे.

बरे झालेल्यांची सर्वाधिक नोंद

देशात रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्राचे राहिले आहे. देशात २४ तासांमध्ये आढळलेल्या नवीन २५ हजार ३२० रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील १५ हजार ६०२ रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रात एका दिवसात सात हजार ४६७ बरे झालेल्या रुग्णांसह एका दिवसात बरे झालेल्यांची सर्वाधिक नोंद झाली. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात 
गेल्या २४ तासांत देशात आढळलेल्या रुग्णांपैकी ८७.७३ टक्के रुग्ण महाराष्ट्रासह केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू आणि मध्य प्रदेशातील आहेत. केरळमध्ये दोन हजार ३५, तर पंजाबमध्ये एक हजार ५१० नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय कर्नाटकमध्ये ९२१, गुजरातमध्ये ७७५, तमिळनाडूमध्ये ६९५, मध्य प्रदेशात ६७५ रुग्णांची नोंद झाली. सद्यःस्थितीत देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दोन लाख दहा हजार ५४४ इतकी असून, सक्रिय रुग्णांपैकी महाराष्ट्र, केरळ, पंजाबमधील रुग्णांचे प्रमाण ७६.९३ टक्के आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

बरे रुग्णांचा राष्ट्रीय दर ९६.७५ टक्के 
देशात आतापर्यंत एकूण एक कोटी नऊ लाख ८९ हजार ८९७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होण्याचा राष्ट्रीय दर ९६.७५ टक्के आहे. गेल्या २४ तासांत एकूण १६ हजार ६३७ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचे सहा राज्यातील प्रमाण ८३.१३ टक्के आहे. त्यात केरळमधील तीन हजार २५६, पंजाबमधील एक हजार २४, कर्नाटकमधील ९९२, गुजरातमधील ५७९, तमिळनाडूमधील ५१२ कोरोनामुक्तांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत चौदा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही. त्यात राजस्थान, झारखंड, पाँडेचेरी, लक्षद्वीप, मेघालय, दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, लडाख (केंद्रशासित प्रदेश), मणिपूर, मिझोराम, अंदमान आणि निकोबार बेटे व अरुणाचल प्रदेशाचा समावेश आहे. 

निम्मे मृत्यू महाराष्ट्रातील 
गेल्या २४ तासांत १६१ मृत्यू झालेत. त्यात महाराष्ट्रातील ८८ मृत्यूंचा समावेश आहे. सहा राज्यांमधील मृत्यूंचे प्रमाण ८७.४७ टक्के राहिले. त्यात पंजाबमधील २२, केरळमधील १२, छत्तीसगडमधील सहा, तमिळनाडूतील चार, हरियानामधील चार मृत्यूंचा समावेश आहे.