कोरोनाचा रिपोर्ट चक्क १४ मिनिटात? कठोर कारवाई करण्याची मागणी

सिडको (जि.नाशिक) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात चुकीचे रिपोर्ट देणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबवर राज्य सरकार कठोर कारवाई करत आहे. मात्र, शुक्रवारी (ता. १२) नाशिकमध्ये एका खासगी लॅबने ६४ वर्षीय वृद्धाला अवघ्या १४ मिनिटांत कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल दिल्याचे समोर आले असून, संबंधित पॅथॉलॉजी लॅबवर कठोर कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाइकांनी केली आहे. 

खासगी लॅबमधील प्रकार; कारवाईची मागणी 
अशोका मार्ग परिसरात डॉ. दीपक नेरकर यांचे सुप्रीम डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी नावाची लॅब आहे. या लॅबमध्ये गेल्या ५ मार्चला होप क्लिनिक लेबोरेटरीच्या प्रतिनिधीने चंद्रकांत मुळाणे (वय ६४) यांचा स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्यानंतर सुप्रीम पॅथॉलॉजीकडून आरटीपीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट संबंधित रुग्णाला पाठविण्यात आला. त्यावर सॅम्पल घेतल्याची तारीख ५ मार्च व सँपल पोचण्याची वेळ चार वाजून ४२ मिनिटे असून, सॅम्पल रिलीजची वेळ चार वाजून ५६ मिनिटे अशी दाखविण्यात आली आहे. यावरून संपूर्ण रिपोर्ट देण्याचा कालावधी अवघ्या १४ मिनिटांचा दाखविण्यात आला आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

अवघ्या १४ मिनिटांत कोरोना चाचणीचा रिपोर्ट? 
दरम्यान, हा अहवाल अवघ्या १४ मिनिटांचा कसा आला, असा प्रश्‍न संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांना पडला. यानंतर त्यांनी दातार लॅबमध्ये कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, या गोंधळलेल्या अवस्थेमुळे संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांना चांगलाच मनस्ताप झाला. त्यामुळे संबंधित लॅबविरुद्ध तक्रार करणार असल्याचे, रुग्णाच्या नातेवाइकांनी सांगितले. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

 

हे सॅम्पल तिसऱ्या पार्टीकडून आले होते. डाटा एन्ट्री, सर्व्हर डाउन व सॉफ्टवेअर प्रॉब्लेममुळे ही अडचण आली. रिपोर्टसाठी चार ते साडेचार तास लागतात. देशात अशी कोणतीही लॅब नाही, जी १४ मिनिटांत रिपोर्ट देईल. आम्ही कामात नेहमीच काळजी घेतो. 
-डॉ. तृप्ती बोरसे, संचालक, सुप्रीम डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅब 

संबंधित लॅबने अवघ्या १४ मिनिटांत निगेटिव्ह रिपोर्ट दिल्याने आम्हाला शंका आली. त्यानंतर आम्ही दातार लॅबमध्ये तपासणी केली. तेथे पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. या लोकांनी वेठीस धरण्याचे काम केले असून, संबंधित लॅबची तक्रार करून चौकशी करण्यास भाग पाडणार आहे. -अशोक मते, रुग्णाचे नातेवाईक