कोरोनाचा सर्वत्र हाहाकार! जालीम उपाय ‘मालेगाव काढ्या’ची पुन्हा आठवण

नाशिक : गेल्या वर्षी शहरासह मालेगावमध्ये कोरोनाचे महासंकट ओढवले होते. सर्वाधिक रुग्ण मालेगावमध्ये आढळून येत होते. तेथील डॉक्टरांनी केलेल्या उपचाराच्या जोरावर काही दिवसांतच मालेगावची परिस्थिती सामान्य झाली होती.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मालेगाव पॅटर्नची आठवण 

शहरात गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या वर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने जुने नाशिकसह शहराच्या विविध भागातील नागरिकांना मालेगाव पॅटर्नची आठवण होत आहे. दूध बाजारमध्ये मालेगाव येथील डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले होते. त्यानिमित्ताने नागरिक दूध बाजार गाठत डॉक्टर कधी येणार, अशी चौकशी करत आहेत. . तोच पॅटर्न शहरात राबविण्यासाठी जुने नाशिकमधील काही संघटनांनी मालेगावच्या डॉक्टरांना शहरात पाचारण केले होते. अनेक रुग्णांना गुणदेखील आला. शहराच्या अनेक भागातील नागरिकांनी दूध बाजार गाठत उपचार करून घेतले. उपचार पद्धतीत सर्वांत जास्त नावलौकिक ठरला तो मालेगावचा काढा.

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

पुन्हा मालेगाव पॅटर्न राबवा

महिन्याभरापासून पुन्हा गत वर्षासारखी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा कुठेतरी भीती दिसून येत आहे. अशा नागरिकांचा रस्ता पुन्हा दूध बाजारकडे वळला आहे. याच ठिकाणी बज्मे हमदान शहा बाबा कमिटीच्या माध्यमातून मालेगावच्या डॉक्टरांनी त्यांचे क्लिनिक सुरू केले होते. अवघ्या दहा ते वीस रुपयांत त्यांना उपचार मिळाले. इतकेच नव्हे, तर नागरिकांच्या मनातील भीती काढण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. रुग्ण कमी होण्याचे ते एक मोठे कारण ठरले. त्या मुळे दैनंदिन नागरिक कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत डॉक्टर कधी येणार, याची चौकशी करत आहेत. पुन्हा मालेगाव पॅटर्न राबवावा, अशी मागणीही होत आहे. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

मालेगाव काढ्याची होतेय मागणी 
कोरोना आजारावर मालेगावचा काढा प्रभावी ठरला होता. चौकाचौकांत काढ्याची दुकाने थाटली होती. इतकेच काय, तर मेडिकल दुकानदारांनीदेखील मालेगावचा काढा विक्रीस ठेवला होता. काढा आयुर्वेदिक असल्याने त्याचा चांगला प्रभाव रुग्णांना जाणवत होता. त्या मुळे सध्या काढ्याची पुन्हा एकदा मागणी होत आहे. 
 

गेल्या वर्षी कोरोना काळात कमिटीच्या माध्यमातून मालेगाव पॅटर्न राबविला होता. सध्याची परिस्थिती बघता पुन्हा तसे काही करता येईल का, यासाठी प्रयत्न करत आहोत. महापालिका आणि प्रशासनाची परवानगी मिळाल्यास पुन्हा मालेगाव पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न केला जाईल. -झाकिर हाजी, कमिटी पदाधिकारी