कोरोनाची वर्षपुर्ती : पर्यटन क्षेत्र अद्यापही ‘व्हेंटिलेटर’वरच; कोरोनामुळे व्यवसायांना घरघर 

नाशिक : कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राला लागलेली घरघर अद्यापही थांबलेली नाही. कोरोनाच्या वर्षपूर्तीनंतरही पर्यटन क्षेत्र अद्याप ‘व्हेंटिलेटर’वरच आहे. त्या मुळे एक वर्षात पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. अनलॉकच्या प्रक्रियेत पर्यटन क्षेत्राला काहीसा हातभार लागत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भविष्यात पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. 

मार्च २०२० च्या अखेरच्या आठवड्यात देशात लॉकडाउन लागल्यानंतर पर्यटन पूर्णपणे थांबले. सुरवातीला दोन ते तीन महिन्यांत कोरोना संकटावर मात करून पर्यटन पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र एक वर्ष उलटले तरीही परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही. त्या मुळे आज देश व परदेशातील पर्यटन व्यवसायाला खीळ बसलेली असून, या व्यवसायाची ‘न भूतो न भविष्यति’ अशी हानी झाली आहे. भारतात पर्यटन व्यवसायातून सुमारे दोन ते अडीच कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होतो. तर देशाला मोठ्या प्रमाणात महसूलही मिळतो. मात्र कोरोनामुळे हे क्षेत्र पूर्णपणे ठप्प झालेले आहे. पर्यटनावर अवलंबून असलेली वाहतूक सेवा, हवाई सेवा, हॉटेलिंग, टॅक्सी सेवा या क्षेत्रांवरही मोठी कुऱ्हाड कोसळली. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

सात महिन्यांच्या बदलानंतर पुन्हा उतरती कळा 

अनलॉकच्या प्रक्रियेत नोव्हेंबर २०२० नंतर कोरोनाची तीव्रता काहीशी कमी झाली. नागरिक कोरोनासह जगण्यास शिकले. मात्र, पर्यटनात बिनधास्त मौजमजा करण्यावर बंधने आली. या मुळे नागरिकांसह सेवा देणाऱ्यांनी आपल्या सवयींमध्ये बदल केला. शासकीय नियमांचे पालन करण्यास सुरवात झाली. या मुळे नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत देशांतर्गत पर्यटनास चांगला वाव मिळाला. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्‍मी‍र आदी ठिकाणी लोकांनी भेट देण्यास सुरवात केली; पण परिस्थिती पाहूनच प्लॅनिंग केले गेले. हॉटेलऐवजी स्वतंत्र व्हिला, बंगलो याठिकाणी राहण्यास प्राधान्य दिले जाऊ लागले. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एकदा पर्यटन क्षेत्र ठप्प झाले आहे. या मुळे हे क्षेत्र आर्थिकदृष्ट्या दहा वर्ष मागे फेकले गेले आहे. पुढील सहा महिने हीच परिस्थिती राहिल्यास या क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहेत. 
 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

कोरोनामुळे पर्यटन क्षेत्र पूर्णपणे कोलमडले आहे. मागील दोन ते महिन्यांत पर्यटनास चालना मिळाली. मात्र आता पुन्हा परिस्थिती बिघडली आहे. जर पुढील सहा महिने अशीच गेले तर पर्यटनावर अवलंबून असलेली सुमारे ७० टक्के लोक बेरोजगार होतील. पर्यटनात आता ऑनलाइन सेवेस प्राधान्य दिले जात असल्याने देखील ट्रॅव्हल एजंट यांना मोठा फटका बसला आहे. पर्यटनास लोक जेव्हा बाहेर पडतील तेव्या ‘लोकल टू व्होकल’ संकल्पना राबविल्यास पर्यटनावर अवलंबून असलेले लोक सावरतील. 
- मनोज वासवानी, उपाध्यक्ष, तान