नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे होणार्या मृत्यूंची संख्या चिंताजनकरित्या वाढते आहे. मंगळवारी (ता.13) दिवसभरात जिल्ह्यात 32 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर तीन हजार 343 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक राहिल्याने ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत 710 ने घट झाली असून, सध्या जिल्ह्यात 35 हजार 932 बाधितांवर उपचार सुरु आहेत.
नाशिक शहरातील चौदा..
मंगळवारी झालेल्या 32 मृत्यूंमध्ये नाशिक शहरातील चौदा, नाशिक ग्रामीणमधील सोळा तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील दोन बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमधील मृतांमध्ये नांदगाव तालुक्यातील चौघांसह निफाड तालुक्यातील तीन, नाशिक व येवला तालुक्यातील दोन, मालेगाव ग्रामीण, इगतपुरी, सिन्नर, देवळा व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात आढळलेल्या कोरोना बाधितांपैकी नाशिक शहरातील एक हजार 853, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 369, मालेगाव महापालिका क्षेत्रातील 111, जिल्हा बाहेरील दहा पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात चार हजार 021 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.
हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू
पाच मृत चाळीशीच्या आतील
कमी वयातील कोरोनाबाधितदेखील कोरोनाचे शिकार ठरत आहेत. काल प्रमाणे मंगळवारीदेखील कोरोनामुळे चाळीशीच्या आतील पाच बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात चिंचवड (ता.मालेगाव) येथील 33 वर्षीय, नशिक शहरातील काठे गल्लीतील 35 वर्षीय, पवननगरमधील 38 वर्षीय महिलेचा तर जेलरोड येथील 39 वर्षीय आणि मेशी (ता.देवळा) येथील 32 वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात
आठ हजार 428 अहवाल प्रलंबित
सायंकाळी उशीरापर्यंत आठ हजार 428 अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक चार हजार 279 प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणचे असून, शहरातील तीन हजार 653, मालेगाव क्षेत्रातील 496 रुग्णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्हाभरातील रुग्णालये व गृहविलगीकरणात दोन हजार 214 संशयित दिवसभरात दाखल झाले. यापैकी एक हजार 873 संशयित नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्हा रुग्णालयातील अकरा, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयातील तीस, नाशिक ग्रामीणमधील 240, तर मालेगाव क्षेत्रातील साठ रुग्णांचा यात समावेश आहे.