कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पायाभूत सुविधा; प्रशासनाचे व्यापक नियोजन

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात प्रत्येक गरजू रुग्णाला रुग्णालय, डॉक्टर आणि ऑक्सिजनसह योग्य उपचार मिळतील अशा पद्धतीचे प्रशासकीय नियोजन सुरू आहे. साथरोगाचे आकडे निश्‍चित नसले, तरी गणितीय पद्धतीच्या आकडेमोडीनुसार साधारण जिल्ह्यात १८ हजार ५०० संभाव्य रुग्णांचा आकडा गृहीत धरला आहे, तर प्रत्यक्षात प्रशासनाने त्यापेक्षा जास्त व्यापक नियोजन केले आहे. 

प्रत्येक रुग्णाला उपचार अन्‌ बेडही 
दसरा-दिवाळीत अनलॉक सुरू झाल्यानंतर वाढलेल्या गर्दीचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. रोज सरासरी ८० ते १०० इतकी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाची तीव्रता कमी झाली असली, तरी अद्याप कोरोनाच्या पहिल्या लाटेचाच प्रादुर्भाव आहे. अशातच दुसऱ्या संभाव्य लाटेची चर्चा सुरू झाल्याने प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे. राज्यात नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर कमी असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. नानाविध प्रयोग राबविलेल्या नाशिक जिल्ह्यातील यंत्रणा तोंड देण्यास पूर्णपणे तयार असल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न 

शहरात तयारी; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पायाभूत सुविधा 
एप्रिलमध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्येत वाढ होत गेली. मेअखेरपर्यंत नियंत्रणात असलेला कोरोना जूननंतर मोठ्या प्रमाणात फैलावला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कोरोनाचे मागचे सर्व रेकॉर्ड तोडले. ऑक्टोबर महिन्यात मात्र कोरोनाचा आलेख खालावला. १६ व १७ नोव्हेंबर या दिवशी नीचांकी १९९ रुग्ण शहरात आढळले. मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर महापालिकेने डॉ. जाकिर हुसेन रुग्णालय, नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालय, नाशिक-पुणे महामार्गावरील समाजकल्याण, मेरी येथील वसतिगृह, ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये एक हजार ५२५ बेडची व्यवस्था केली. 

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा

संभाव्य रुग्णसंख्या 
नाशिक जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णसंख्या शिगेला होती, त्यात १० टक्के वाढ गृहीत धरून प्रशासनाने १८ हजार ५५० ही संभाव्य रुग्णसंख्या गृहीत धरली आहे. पण प्रत्यक्षात मात्र त्याहून अधिक प्रमाणात प्रशासनाने नियोजन केले आहे. 

ऑक्सिजनची व्यवस्था 
जिल्ह्यात रोज प्रतिदिन दहा टन ऑक्सिजनची गरज आहे. सध्या ही क्षमता ८४ टनांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र समिती नेमलेली असून, वैद्यकीय सेवेसाठी प्रथम प्राधान्याने ऑक्सिजन पुरविण्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. 

प्रशासनाची तयारी 
संभाव्य रुग्णवाढ संख्या - १८,५५० 
संभाव्य बेडची व्यवस्था १८,५५० 
होम आयसोलेशन १०,००० 
उपलब्ध साधारण बेड १३,००० 
खाटा आरक्षित (८० टक्के) ४,३४९ 
व्हेंटिलेशन, ऑक्सिजन बेड (डबल सुविधा) ४,००० 
खासगी रुग्णालये कोविड सेंटर ७२ 

प्रतिदिन ऑक्सिजननिर्मिती १० टन 
जिल्ह्यात उपलब्ध ऑक्सिजन ८४ टन