कोरोनाच्या भितीने वाढला मानसिक तणाव; प्रतिकारशक्ती कमी होत असल्याच्या वाढीव घटना 

नाशिक : वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले असून, भीतीचे वातावरण कायम आहे. कोरोनाच्या ऐकिवात येणाऱ्या गोष्टींमुळे लोकांच्या मानसिक स्थितीबरोबरच शारीरिकही बदल होत असल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याच्या वाढीव घटना नाशिकमध्ये समोर आल्या आहेत. 

ऐकिवात येणाऱ्या गोष्टींमुळेच वाढला मानसिक तणाव 
कोरोनाग्रस्त रुग्णांना नैराश्‍य येण्याची शक्यता अधिक असते. कोरोनामुळे लोकांमध्ये भीती असून, वारंवार कोरोना होणार, अशी शंका मनात येणे यातूनही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना वर्षभरापासून चालू असल्यामुळे कोरोनावरील वाचन, व्हिडिओमुळे लोक त्रस्त होत असून, त्याचे रूपांतर नैराश्‍येत होत आहे. त्यात नैराश्‍येत आत्महत्येसारखे टोकाचे विचार लोकांच्या मनात येत आहेत. कोरोनाची भीती असली तरी सातत्याने सोशल माध्यमाद्वारे कोरोनाचे संदेश मनावर परिणाम करत असून, याचा लहान मुले, वृद्धांवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

भीतीमुळे लोकांच्या मनातील लहरीत सातत्याने बदल

कोरोना विषाणूने वर्षभरात अनिश्‍चितता निर्माण केली. त्यात लॉकडाउनच्या भीतीमुळे लोकांच्या मनातील लहरी सातत्याने बदलत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आता कुठे आर्थिक बाबीत सावरत होतो, त्यात दुसरी लाट आल्यामुळे मानसिक तणावात सर्वांत मोठी समस्या आर्थिक बाबच ठरणार असल्याचे दिसते. कुटुंबातील वादविवाद टाळायचे असतील तर कुटुंबात कायम संवाद असणे महत्त्वाचे आहे. मुलांमध्ये तणावाचे प्रमाण जाणवत नाही. त्या मुळे पालकांनीच पुढाकार घेत मुलांच्या विश्‍वात समरस झाल्यास मुलांमधील चिडचिडेपणा टाळता येऊ शकतो. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

सारख्या तपासणीतूनही तणाव 
काही नागरिकांनी वर्षभरातील कोरोना काळात सातत्याने शरीराच्या तपासण्या केल्या आहेत. अनावश्‍यक नसताना शरीराच्या चाचण्या करणे यातूनही नाशिकमध्ये मानसिक तणावाच्या घटना घडल्या आहेत. त्या मुळे नागरिकांनी गरज असेल तरच आवश्‍यक असलेल्या चाचण्या कराव्या. त्या मुळे मनातील भीती दूर होऊन मानसिकता चांगली राहण्यास मदत मिळणार आहे. 

कोरोनामुळे ऐकिवात येणाऱ्या गोष्टींमुळे नैराश्‍य वाढले आहे. मुलांना स्क्रीनचे व्यसन लागले आहे. त्यात मोबाईल, लॅपटॉपचे प्रमाण वाढल्यामुळे गुंता वाढला आहे. यातून मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. त्यातच वयोवृद्धांना घरात बसावे लागत असल्यामुळे त्यांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 
-डॉ. जयंत ढाके, मानोपसचारतज्‍ज्ञ