नाशिक : कोरोनामुळे अनेक कुटुंबावर दुःखद प्रसंग बेतत असून, सुन्न करणाऱ्या घटना उघडकीस येता आहेत. मूळच्या जळगाव येथील पाटील कुटुंबीयांसोबत घडलेली दुर्दैवी घटना अंगावर काटा आणणारी आहे.
मुंबई येथील कंपनीत सायंटिस्ट असलेल्या डॉ. नीलेश पाटील (वय ३७) यांच्या निधनापाठोपाठ त्यांचे वडील लक्ष्मण पाटील (वय ६२) यांचा संसर्गाच्या लाटेने बळी घेतला आहे. कुटुंबातील लग्नसोहळ्यासाठी जळगावला आलेले असताना संसर्गाची लागण झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी
कौटुंबिक सोहळ्यात संसर्ग
मूळचे जळगाव येथील पाटील कुटुंबातील डॉ. नीलेश पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले होते. सध्या ते मुंबईतील नामांकित कंपनीत प्रिन्सिपल सायंटिस्ट म्हणून जबाबदारी सांभाळत होते. पत्नी, मुलगा व मुलीसोबत ते मुंबईला नोकरीनिमित्त वास्तव्यास होते. जळगावला कुटुंबातील सदस्याच्या विवाहासाठी ते मुंबईहून मार्चअखेरीस आले होते. लग्नसोहळा आटोपल्यानंतर ते मुंबईला नोकरीसाठी परतले. त्यातच त्यांना ताप आल्याने वडिलांच्या सूचनेनुसार नाशिकला उपचारार्थ आणण्यात आले. यादरम्यान त्यांचे वडील लक्ष्मण पाटील यांनाही ताप आल्याने त्यांनाही नाशिकच्याच खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तत्पूर्वी दोघांच्या कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आली होती. त्यातच उपचार सुरू असताना डॉ. नीलेश पाटील यांचे रविवारी (ता. ४) निधन झाले. तर त्यांचे वडील लक्ष्मण पाटील यांची प्राणज्योत सोमवारी (ता. ५) मालवली. कौटुंबिक सोहळ्यात संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी नेमका प्रवासादरम्यान ते संसर्गाच्या विळख्यात सापडल्याची शक्यतादेखील व्यक्त होत आहे. लक्ष्मण दौलत पाटील (वय ६२) हे दूध फेरडेशनचे निवृत्त कर्मचारी होते. जितेंद्र व राकेश पाटील यांचे ते वडील होत.