कोरोनाच्या संभाव्य लसीसाठी महापालिका सज्ज; नागरिकांना टप्प्याटप्याने देणार लस

नाशिक :  कोरोनाची संभावित लस आल्यास साठवणुकीसाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने ३१ शीतसाखळीगृह उपकरणे सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला असून, टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी महापालिकेसह खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे केंद्र सरकारकडून कोरोना लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व महापालिकेला नियोजनाच्या सूचना केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने लस साठवणुकीसाठी शीतगृहे ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेला दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय विभागानेदेखील लसीकरणाची तयारी सुरू केली असून, सात नोडल अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षित नोडल अधिकारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करतील. महापालिकेतर्फे दर वर्षी डिसेंबरमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाते त्याच धर्तीवर वैद्यकीय पथकामार्फत कोरोना लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर शीतसाखळी उपलब्ध करणे आवश्यक असल्याने त्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शीतसाखळी निर्माण केली जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
 

खासगी रुग्णालयांमार्फतही लस 

वीस लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या नाशिककरांना कोरोना लस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. महापालिकेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपलब्ध होणार नसल्याने खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. त्यांनाही प्रशिक्षण दिले जाईल. लस टोचण्यासाठी महापालिकेकडून निश्‍चित कार्यक्रम आखला जाईल. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ