लासलगाव : पुढारी वृत्तसेवा- कोविडमध्ये बंद करण्यात आलेल्या सहा रेल्वेगाड्या अद्यापही सुरू न झाल्याने प्रवाशांचे होत असून, या गाड्या पूर्ववत कराव्या, अशी मागणी लासलगावकरांकडून होत आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
आशिया खंडातील कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगावची ओळख आहे. त्यातही लासलगावसह शहराच्या आजूबाजूच्या 30 ते 35 खेड्यांमधील महाविद्यालयीन युवक-युवती तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त ये-जा करणाऱ्यांची नाशिकला ये-जा सुरू असते. मात्र, अद्याप कोराेना काळात बंद करण्यात आलेल्या गाड्या सुरू न झाल्याने या प्रवाशांची हाल होत आहेत. याबाबत प्रवासी संघटनेकडून मंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र, याबाबत कुठलाही सकारात्मक निर्णय न झाल्याने संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच केंद्राच्या अमृत भारत योजनेमार्फत कोट्यवधींची कामे लासलगाव रेल्वेस्थानकावर सुरू आहेत. मात्र, प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या आणि पूर्वी थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांना अद्यापही थांबा मिळत नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
रेल्वे सल्लागार समिती पदाधिकाऱ्यांची चुप्पी
येथील अनेक रिक्षाचालकांचा उदरनिर्वाह हा रेल्वेगाड्यांवर अवलंबून आहे. मात्र, गाड्याच बंद झाल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातील काहींनी भाजीपाला व्यवसाय सुरू केला आहे. तर काहींचा कांदा खळ्यावर काम करत उदरनिर्वाह सुरू आहे. विशेष म्हणजे रेल्वे सल्लागार समितीवर घेतलेल्या पदाधिकाऱ्यांकडूनही याबाबत कोणतीच भूमिका घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त करत आहेत.
या रेल्वेगाड्या आहेत बंद
मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस, मनमाड- इगतपुरी शटल, मुंबई -हावडा.
हेही वाचा :
- इंग्लंडमध्ये आढळले मगरीसारखे दिसणारे कासव
- पंचायत समितीत भरली शाळा! शिक्षकांची बदली झाल्याने पालकांचे आंदोलन
- Nashik News : ऑनलाइन बांधकाम परवानग्या ठप्प, बीपीएमएस सॉफ्टवेअर पडले बंद
The post कोरोनात बंद झालेल्या सहा गाड्यांना मिळेना थांबा, लासलगावकर संतप्त appeared first on पुढारी.